अमरावती - धुळवडीच्या दिवशी भर दुपारी अमरावती शहरातील फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या विद्यापीठालगतच्या मार्डीस मार्गावर एका युवकाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला. या घटनेमुळे लगतच्या परिसरात खळबळ उडाली आहे. अंकित सदानंद तायडे (23), असे मृत युवकाचे नाव आहे.
अंकित तायडे हा पंढरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या वडाळी परिसरातील प्रबुद्ध नगर येथील रहिवासी होता. वर्षभरापूर्वी त्याचा चपराशीपुरा परिसरातील काही युवकांशी वाद झाला होता. या वादाचाच वचपा वर्षभरानंतर आज(मंगळवारी) रंगपंचमीच्या दिवशी काढण्यात आला असावा, अशी शक्यता आहे. घटनेची माहिती मिळताच फ्रेजरपुरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून पोलीस निरीक्षक मेश्राम या घटनेचा अधिक तपास करत आहेत.