महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनाच्या सावटाखाली सोमवारपासून उडणार अमरावती - अमरावतीत लॉकडाऊन शिथिल

अमरावतीत कोरोना रुग्णांचा आकडा सातत्याने वाढत असताना सोमवारपासून शहरातील सर्वात गजबजलेला इतवारा बाजार खुला करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.

Amravati reopen
कोरोनाच्या सावटाखाली खुली होणार अमरावती

By

Published : Jun 7, 2020, 10:31 PM IST

अमरावती - शहरात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या कोरोनाच्या सावटाखाली अमरावती शहर सोमवारपासून सुरू होणार आहे. अमरावतीत कोरोनाबाधितांची संख्या आता २७९वर पोहोचली आहे. तर शहरात ७८ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

जवळपास संपूर्ण शहर कोरोनाने व्यापले आहे. रविवारी जयस्तंभ चौक परिसरातील रहिवासी असणाऱ्या एका कुटुंबातील 8 वर्षाचा चिमुकला कोरोनाबाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. यासोबतच वडाळी परिसरातील प्रबुद्ध नगर येथे 40 वर्षीय पुरुष, यशोदा नगर परिसरात 19 वर्षाची महिला आणि विलासनगर भागात 57 वर्षाच्या पुरुषाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

कोरोना रुग्णांचा आकडा सातत्याने वाढत असताना सोमवारपासून शहरातील सर्वात गजबजलेला इतवारा बाजार खुला करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. बाजारातील एका बाजूची दुकाने ही १,३,७,९ या विषम तारखेला उघडी राहतील तर दुसऱ्या बाजूची दुकाने ही २,४,६,८,१० अशा सम तारखेला खुली राहणार आहेत. बाजारात सामाजिक अंतर, तोंडाला मास्क बांधणे बंधनकारक राहणार आहेत. जे व्यावसायिक नियम पाळनार नाहीत, त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.

ज्या दिवशी ज्या बाजुची दुकाने बंद असतील त्या दुकानासमोर वाहन पार्किंगची व्यवस्था केली जाणार आहे. इतवारा बाजार सोबतच सक्करसाथ या ठोक बाजारपेठेत एकूण ९७ दुकाने आहेत. या दुकानांची एक रांग सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या दिवशी खुली असेल तर दुसऱ्या रांगेतील दुकान मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी उघडतील. जयस्तंभ चौक येथील प्रियदर्शनी आणि पटेल मार्केट हे सुद्धा सम आणि विषम तारखेच्या नियमानुसार सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत उघडता येणार आहे.

एकूणच अमरावती शहरातील सर्व मुख्य बाजारपेठा सोमवारपासून खुल्या होणार आहेत. इतवारा बाजार, सक्करसाथ, जयस्तंभ चौक या भागापासून कोरोनारुग्ण असणारा परिसर जवळ आहे. यासह अंबागेट, जवाहर गेट, नागपुरी गेट, खोलपुरी गेटच्या आता जुन्या अमरावती शहरात अनेक कोरोना रुग्ण आढळून आल्याने या भागात शुकशुकाट असून हा सर्व परिसर शहरातील मुख्य बाजारपेठेपासून थोड्याच अंतरावर आहे. शहरातील व्यवसाय पुन्हा एकदा नवी उभारी घेऊन सुरू व्हावा, यासाठी सोमवारपासून नवी सुरुवात केली जात आहे. त्यामुळे नागरिकांना खबरदारी घेऊनच घराबाहेर पडावे लागणार आहे. प्रशासनाच्यावतीनेही तसे आवाहन करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details