अमरावती- कोरोना चाचणीसाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात सुसज्ज प्रयोगशाळा उभी करण्यात आली आहे. या प्रयोगशाळेतून अवघ्या तासाभरात एकूण 12 स्वॅबचे अहवाल तपासणे शक्य होणार आहे. मात्र, विद्यापीठातील कोरोना चाचणीसाठी उभारण्यात आलेल्या या प्रयोगशाळेबाबत अनेकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. या प्रयोगशाळेमुळे विद्यापीठ परिसर पूर्णतः बंद ठेवण्याची वेळ येणार असणल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर आणि कुलसचिव डॉ. तुषार देशमुख यांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याकडे या प्रयोगशाळेबाबत प्रस्ताव सादर केला होता. विद्यापीठातील सुक्ष्म जीवशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. प्रशांत ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखालील एक चमू या प्रयोगशाळेत कोरोना चाचणी करण्यासाठी सज्ज आहे.
अमरावती विद्यपीठातील 'कोरोना चाचणी' प्रयोगशाळेबाबत संभ्रम... नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील कोरोना तपासणी प्रयोग शाळा बुधवारपासून कार्यान्वित झाली आहे. राष्ट्रीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून या प्रयोगशाळेला मान्यता मिळाली आहे. विशेष म्हणजे या प्रयोगशाळेच्या 100 मीटर अंतरापर्यंत कुणीही येणार नाही, याची दक्षता घेण्यात आली आहे. 100 मीटर अंतराची बाब समोर येताच अमरावती विद्यापीठातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
अमरावती विद्यपीठात ज्या ठिकाणी प्रयोगशाळा आहे, त्या ठिकाणापासून 100 मीटरच्या अंतरावर विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीसाह एकूण 18 विभागाच्या इमारती येतात. यामुळे ही प्रयोगशाळा सुरू होताच विद्यापीठात कोणालाही प्रवेश मिळणार नाही. या संदर्भात आज जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दोन चार महिने परीक्षा घेतल्या नाहीत. किंवा विद्यापीठ दोन चार महिने बंद राहिले तर कुठलीही अडचण येणार नाही. काही अडचण येत असेल तर आम्ही कुलगुरूंशी चर्चा करून मार्ग काढू असेही आश्वासन त्यांनी दिले आहे. कोरोना चाचणी प्रयोगशाळा सुपर स्पेशालिटी रुग्णालय किंवा डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयात सुरू करावी, असा सूरही आता उमटत आहे.