अमरावती- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील सर्व आभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा कालपासून (२० ऑक्टोबर) सुरू झाल्या होत्या. या परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय आज जाहीर करण्यात आला आहे. नियोजन शून्य असणाऱ्या विद्यापीठाचे काम रामभरोसे असल्याची ओरड आता विद्यार्थी आणि पालक करीत आहेत.
यापूर्वी दोन वेळा परीक्षा समोर ढकलण्यात आल्यावर कालपासून ऑनलाइन परीक्षेला सुरुवात होताच परीक्षार्थ्यांचे लॉगिन आयडी आणि पासवर्ड चुकीचा असल्याचा संदेश स्क्रीनवर येत होता. ऑनलाइन परीक्षा अशक्य असल्याने विद्यापीठाने काल रात्री ८ वाजेपर्यंत कोणत्याही महाविद्यालयात जाऊन ऑफलाइन परीक्षा द्या, असा अजब निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर कालचा पेपर ७ नोव्हेंबरला घेतला जाईल, असे जाहीर करण्यात आले होते.