अमरावती- कोरोनामुळे सलग दोन वर्षे विस्कळीत झालेली संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची परीक्षा प्रणाली आता रुळावर येत आहे. विद्यापीठाच्या वतीने हिवाळी 2021-2022 च्या परीक्षा एक जानेवारीपासून घेतल्या जाणार असून विद्यार्थ्यांना या परीक्षा ऑनलाइन व ऑफलाइन, अशा दोन्ही पर्यायांपैकी ऐच्छिक पर्यायानुसार देता येणार आहे.
माहिती देताना परीक्षा नियंत्रक देशमुख तीन लाख विद्यार्थी देणार परीक्षा
1 जानेवारीपासून अभियांत्रिकी शाखेच्या परीक्षा सुरू होणार असून इतर शाखेच्या परीक्षा या 17जानेवारीपासून सुरू होत आहे. एकूण तीन लाख विद्यार्थी परीक्षा देणार असून अडीच लाख विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने परीक्षेसाठी अर्ज दाखल केले आहेत. अर्ज महिन्याचा कालावधी उलटला तरी आणखी चार ते पाच दिवस अर्ज भरण्यासाठी मुदत दिली जाईल, अशी माहिती विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. हेमंत देशमुख यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
परीक्षा अर्ज स्वीकारले गेले ऑनलाइन
दहा डिसेंबरपर्यंत परीक्षा अर्ज स्वीकारण्याची मुदत देण्यात आली होती. परीक्षा अर्ज हे ऑनलाइन पद्धतीनेच विद्यापीठाने स्वीकारले विद्यापीठाच्या संकेतस्थळावर परीक्षार्थींना 'यू कॅन अप्लाय' नामक लिंक देण्यात आली. या लिंकच्या माध्यमातूनच परीक्षा अर्ज भरण्यात आले अमरावती, अकोला, वाशीम, यवतमाळ आणि बुलडाणा, अशा पाचही जिल्ह्यातील साडेतीनशे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षा अर्ज भरले आहेत. अर्ज भरण्याची मुदत आणखी काही दिवस वाढण्याची शक्यता आहे.
90 शाखांच्या 600 परीक्षा
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या हिवाळी 2022 सत्रासाठी 600 परीक्षा घेतल्या जाणार आहेत. एकूण नव्वद शाखांच्या या परीक्षा होणार असून विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने प्रश्नपत्रिका तयार केल्या आहेत.
हे ही वाचा -Bacchu Kadu on Melghat Visit : अंध-अपंग दाम्पत्याला न्याय, रेशन कार्ड साठीची तीन वर्षाची वणवन तीन तासांत थांबवी