अमरावती -शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला आज अमरावती शहरात उत्तम प्रतिसाद मिळाला. शहरातील सर्व व्यापारी प्रतिष्ठान बंद होती. रोजच्या तुलनेत वाहतूकही अल्प होती. शेतकऱ्यांसाठी व्यापाऱ्यांनी आज आपला व्यवसाय बंद ठेवावा, असे आवाहन करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या महाविकास आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्यावतीने शहरात मोर्चा काढण्यात आला. तसेच कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्वतंत्र मोर्चा काढून व्यापाऱ्यांना शहर बंद ठेवण्याचे आवाहन केले.
राजकमल चौकातून मोर्चा
महाविकास आघाडीच्यावतीने राजकमल चौक येथून मोर्चा काढण्यात आला. अमरावतीच्या आमदार सुलभा खडके, शिवसेनेचे नेते माजी खासदार अनंत गुढे यांच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरेखा ठाकरे यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. राजकमल चौक येथून निघालेला मोर्चा गांधी चौक, इतवरा बाजार, चित्रा चौक, जवाहर गेट येथून जयस्तंभ चौकात पोचला. जयस्तंभ चौकात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला नेत्यांनी अभिवादन केले. यानंतर हा मोर्चा इर्विन चौकात पोचला. इर्विन चौक येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करणात आले.