अमरावती -आपलं फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याची दोन दिवसांपूर्वी फेसबुक पोस्ट करणाऱ्या अमरावती शहर पोलीस विभागातील पोलीस उपनिरीक्षक अनिल मुळे यांनी आज दुपारी अमरावतीनजीक असलेल्या रहाटगावं शेतशिवारात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.
अनिल मुळे यांची नेमणूक फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन येथे करण्यात आली होती. काही दिवस नोकरी करुन ते गेल्या चार महिन्यापासून ड्युटीवर गैरहजर होते. यापूर्वी त्यांनी गाडगेनगर डीबी स्कॉड उत्तमरित्या हाताळले. त्यांनी अचानक रहाटगाव शेतशिवारात जाऊन झाडाला गळफास घेऊन आत्महत्या का केली याचा उलगडा मात्र होऊ शकला नाही. नांदगाव पेठ पोलिसांना माहिती होताच त्याठिकाणी जाऊन पंचनामा करण्यात आला. मृत्यूची माहिती नातेवाईकांना देऊन शवविच्छेदनकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. आत्महत्या कोणत्या कारणामुळे केली याचा तपास नांदगाव पेठ पोलीस करीत आहे.