अमरावती -नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात अमरावतीमध्ये मुस्लीम समाजाच्यावतीने मोर्चाचे आयोजन करण्याचे निश्चित करण्यात आले. मात्र, पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारल्यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अमरावती शहरामध्ये तणावाचे वातावरण
बुधवारी कामगारांचा देशव्यापी संप आहे. त्यामुळे शहरात कामगारांचा भव्य मोर्चा निघणार आहे. याच वेळी मुस्लीम समुदायाच्यावतीनेही मोर्चाचे नियोजन करण्यात आले. मोर्चात सहभागी होण्यासाठी मुस्लीम समुदाय सायन्स कोअर मैदान येथे जमा झाला. सायन्स कोअर मैदानातून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार होता.
हेही वाचा - कामगार संघटनांचा देशव्यापी संप; मुंबईत शाळा, महाविद्यालयांसह वाहतूक सेवा सुरू
या मोर्चासाठी अगोदर परवानगी घेतली नाही. शहरात कामगारांचा मोर्चा निघणार असल्याने वेळेवर मोर्चाला परवानगी देता येणार नाही, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी मुस्लीम समुदायाच्या नेत्यांना सांगितले.
मोर्चाची परवानगी मिळत नसेल तर आम्हाला तरुंगात टाका, अशी भूमिका मुस्लिमांनी घेतली. सायन्स कोअर मैदानातच शेकडो मुस्लिमांनी जेलभरो आंदोलनाचा नारा देत ठिय्या मांडला. मोर्चासाठी एकत्र आलेल्या मुस्लीम समाजातील अनेकांना पोलिसांनी अटक केली. या संपूर्ण घटनेमुळे शहरात काहीसे तणावाचे वातावरण असून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.