अमरावती - शिक्षक मतदारसंघ निवडणुकांसाठी 1 डिसेंबरला मतदान होणार आहे. यानंतर 3 डिसेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. यामुळे 29 नोव्हेंबर ते 3 डिसेंबरपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात 'ड्राय डे' घोषित करण्यात आला. यावर परमीट रूम असोसिएशनच्यावतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
शिक्षक दारुडे, म्हणून चार दिवस 'ड्राय डे'... वाचा सविस्तर! बुद्धिजीवी शिक्षक दारुडे असल्याचं निवडणूक आयोगाला वाटत असावं, म्हणून चार दिवसांचा ड्राय-डे घोषित करण्यात आल्याचा टोला अमरावती जिल्हा परमीट रूम असोसिएशनने लगावला आहे. याविरोधात त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
अमरावती जिल्ह्यात 12 हजार तर संपूर्ण विभागात 38 हजार शिक्षक मतदार आहेत. देशाचे भविष्य असलेल्या विद्यर्थ्यांना चांगले संस्कार शिकवणाऱ्या शिक्षकांना ड्राय डे ची आवश्यकता काय, असा प्रश्न उपस्थित करून अमरावती जिल्हा परमीट रूम असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
उच्च न्यायालयात याचिका
जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चार दिवस ड्राय-डे राहणार असल्याचे स्पष्ट केले. मात्र, परमीट होल्डर नितीन मोहोड यांनी उच्च न्यायलयात याचिका दाखल करून दाद मागितली आहे.