अमरावती :महानगर पालिकेने एक वेगळाच निर्णय घेतला आहे. अमरावती महापालिकेने भाडेतत्त्वावर दिल्या जाणाऱ्या घरांवर तसेच मोठ्या इमारतींमधील गाळ्यांवर एकूण वसूल केल्या जाणाऱ्या भाडेपट्टीपैकी 50% रक्कम ही कर स्वरूपात वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे व्यापारी बांधकाम व्यावसायिक यांच्यासह मालमत्तेमध्ये गुंतवणूक करणाऱ्या सर्वसामान्य अमरावती करांमध्ये असंतोष पसरला आहे. महाराष्ट्रात अशा स्वरूपाचा कर कुठल्याही अन्य महापालिकेने लावला नसताना केवळ अमरावती महापालिकेने घेतलेला हा निर्णय शहराच्या औद्योगिक विकासाला बाधा निर्माण करणारा असल्याची ओरड आता व्हायला लागली आहे.
काय आहे महापालिकेचा निर्णय :अमरावती महापालिकेने शहरातील मालमत्ता कर हा 2005 -06 पासून वाढवला नाही. मध्यंतरी अमरावती महापालिकेचे आयुक्त म्हणून चंद्रकांत गुडेवार यांनी 2016 -17 मध्ये अमरावती शहरातील मालमत्ता कर वृद्धीचा निर्णय घेतला होता. त्यासाठी शहरातील सर्व मालमत्ता मोजण्यासाठी यंत्रणा देखील सज्ज झाली होती मात्र अमरावतीकरांचा प्रचंड रोष आणि राजकीय हस्तक्षेपामुळे कर वृद्धी होऊ शकली नाही. आता मात्र 17 वर्षापासून वाढवला नसलेला कर शहरातील मालमत्ता धारकांपासून वसूल करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.
कायद्यानुसार निर्णयाची अंमलबजावणी: मालमत्तेची एकूण किंमत लक्षात घेऊन रेडी रेकनर नुसार संबंधित मालमत्ता कोणाला भाडेपट्टीवर दिल्यावर भाडेपट्टीच्या एकूण रकमेपैकी 50% रक्कम ही करस्परुपात अमरावती महापालिकेकडे वळती करावी लागणार आहे. हा निर्णय चुकीचा नसून कायद्यानुसारच या निर्णयाची अंमलबजावणी महापालिकेने केली असल्याचे अमरावती महापालिकेचे कर निर्धारण अधिकारी महेश देशमुख यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना स्पष्ट केले. न्यायालयाने देखील आमचा निर्णय योग्य असल्याचे स्पष्ट केले असल्याचे महेश देशमुख यांनी सांगितले.
अमरावतीकरांचा निर्णयावर आक्षेप : आज अमरावती शहरात अमरावती महानगरपालिकेमध्ये जी व्यावसायिक प्रतिष्ठाने आहेत ही मालमत्ता भाड्याने दिल्यास अमरावती महापालिका यावर 56 टक्के कर आकारात आहे. हा कर अतिशय अन्यायकारक असून भारत स्वतंत्र झाला की नाही असेच या करामुळे वाटायला लागले असल्याचे क्रीडायचे अमरावती जिल्हा अध्यक्ष शैलेश वानखडे ईटीव्ही भारतशी बोलताना म्हणाले. या करावर बरीच भर म्हणजे यावर 17 टक्के जीएसटी आणि दोन टक्के सर्च चार्ज देखील आकारण्यात आला आहे. जर एखाद्या घरमालकाने आपले घर दहा हजार रुपये भाड्याने दिले, तर या अशा करामुळे घरमालकाला काय शिल्लक राहणार हा मोठाच प्रश्न आहे.
पालिकेचा निर्णय चुकीचा ? : सेवानिवृत्त झालेल्या अनेक शासकीय कर्मचाऱ्यांनी भविष्याचा आर्थिक स्रोत म्हणून सदनिका खरेदी केल्या. त्याद्वारे आपल्याला भाडेपट्टीच्या स्वरूपात पैसे मिळतील असे अनेकांना वाटले. मात्र महापालिकेच्या अशा निर्णयामुळे अनेकांनी सदनिका किंवा इतर बांधकाम व्यवसायात गुंतवलेले पैसे बाहेर निघणे कठीण झाले असल्याचे देखील शैलेश वानखडे म्हणाले. औरंगाबाद, नागपूर, पुणे, ठाणे अशा महापालिकांमध्ये अशा स्वरूपाची कर आकारणी नसताना अमरावतीचा विकास खुंटवण्याच्या दिशेने महापालिका प्रशासनाने घेतलेला हा निर्णय अतिशय चुकीचा असल्याचे देखील शैलेश वानखडे म्हणाले.