वडाळी तलाव ऐन उन्हाळ्यात रिकामा केल्याने प्रश्न उपस्थित अमरावती :तलावाचा गाळ काढणे, तलावाचे सौंदर्यकरण करणे या नावाखाली अमरावती महापालिका प्रशासनाने शहरातील पाण्याने तुडुंब भरलेला वडाळी तलाव ऐन उन्हाळ्यात रिकामा केला. या तलावातील पाणी साठवण्याची व्यवस्था असतानाही महापालिका प्रशासनाने आपल्या नियोजन शून्य धोरणामुळे या तलावातील लाखो लिटर पाणी चक्क आंबा नाल्यात सोडून दिले. विशेष म्हणजे या तलावाचे कुठलेही काम सुरूच झालेले नाही अशा परिस्थितीत आता हा तलाव रिकामा झाल्यामुळे परिसरातील विहिरी आटायला लागल्या आहेत. तसेच लगतच्या जंगलातील वन्य प्राण्यांना देखील पिण्यासाठी पाणी उपलब्ध राहिले नसल्यामुळे महापालिका प्रशासनाच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
पर्याय असताना पाणी सोडले नाल्यात :अमरावती शहरालगत नैसर्गिक दृष्ट्या असणाऱ्या पहाडांच्या मधल्या भागात इंग्रजांनी एकूण चार तलावांची निर्मिती केली. यामध्ये छत्री तलाव वडाळी तलाव, वडाळी तलाव मागे असणारे फुटका तलाव आणि भवानी तलावाचा समावेश आहे. निसर्गतःच भवानी तलाव भरला की त्यातील पाणी फुटक्या तलावात पाहून येते. फुटकातला भरला की त्यातील पाणी वडाळी तलावात वाहत येते. आता अमरावती महापालिका प्रशासनाने वडाळी तलावाच्या दुरुस्तीसाठी एकूण साडे 19 कोटी रुपये खर्च करणार असे जाहीर केले आहे. वडाळी तलावातील संपूर्ण पाणी अक्षरशः मोटर लावून आंबानाल्यात सोडून दिले. सलग दीड दोन महिने वडाळी तलावातील पाणी आंबानाल्यात वाहून गेले. विशेष म्हणजे वडाळी तलावातील पाणी मोटार लावून लगतच्या वनविभागाच्या अखत्यारीत असणाऱ्या फुटक्या तलावात साठवता आले असते. मात्र, महापालिका प्रशासनाने कुठल्याही प्रकारे दूरदृष्टी न ठेवता वडाळी तलावातील संपूर्ण पाणी वाया घातले. या दुर्दैवी प्रकारामुळे आता महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्या भूमिकेवर आक्षेप घेतला जातो आहे.
परिसरातल्या विहिरींनी गाठला तळ :सुमारे दीडशे वर्ष जुना वडाळी तलाव हा वीस वर्षातून एकदा आटतो. आता 2018 मध्ये हा तलाव पूर्णतः आटला होता. त्यावेळी परिसरातील रहिवाशांनी या तलावातील गाळ काढण्याची मागणी प्रशासनाकडे केली होती. जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी या तलावाच्या कामासाठी कोट्यावधीचा निधी देण्यात येईल अशी घोषणा केली होती. मात्र वडाळी तलावातील गाळ काढण्याचे काम तलाव नैसर्गिकरित्या कोरडा झाला असताना झाले नव्हते. आता मात्र वडाळी तलाव पाण्याने तुरुंग भरला असताना केंद्र आणि राज्य शासनाने या तलावाच्या सौंदर्य करण्यासाठी निधी मंजूर केल्याचे सांगून महापालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर यांनी या तलावातील संपूर्ण पाणी नाल्यात सोडून देण्याचा निर्णय घेतला. तलावातील लाखो लिटर पाणी वाहून गेल्यामुळे या तलावाच्या भरोशावर असणाऱ्या परिसरातील विहिरींचे झरे आटले आहेत. यामुळे वडाळी परिसरासह राज्य राखीव पोलीस दल वसाहत परिसर, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परिसर, दंत महाविद्यालय परिसर अशा दूरवरच्या भागातील विहिरींनी तळ गाठला आहे. अशा परिस्थितीत मे महिन्यात परिसरातील अनेक विहिरी कोरड्या पडतील. महापालिका प्रशासनामुळे निर्माण होणाऱ्या पाण्याच्या भीषण समस्येला नागरिकांना तोंड द्यावे लागणार असल्याबाबतचा रोज वडाळी प्रभागाच्या माजी नगरसेविका सपना ठाकूर यांनी ईटीव्ही भारत शी बोलताना व्यक्त केला. तलाव आता मोठ्या प्रमाणात कोरडा झाला असून या ठिकाणी काम सुरू करावे अशी विनंती मी महापालिका प्रशासनाकडे केली. जिल्हा प्रशासनाच्या वतीने ह्या कामाची परवानगीच मिळाली नसल्याची धक्कादायक माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने सपना ठाकूर यांना देण्यात आली.
वन्य प्राण्यांच्या पाण्याचे काय :वडाळी तलावाच्या मागे वडाळी आणि पोहरा जंगलात मोठ्या संख्येने बिबट, हरीण, सांबर ,नीलगाय, जंगली डुक्कर असे अनेक प्राणी आहेत. दोन वर्षांपूर्वी या जंगलात वाघाचे देखील वास्तव्य होते. जंगलातील हे सर्व प्राणी सध्या वनविभागाच्या हद्दीत असणाऱ्या फुटक्या तलावात पाणी पिण्यासाठी येतात. दरवर्षीप्रमाणे मे महिन्यात फुटका तलाव पूर्णतः कोरडा होतो. अशा परिस्थितीत हे वन्य प्राणी रात्रीच्या अंधारात तसेच पहाटे वडाळी तलावात पाणी प्यायला येतात. आता वडाळी तलावातच पाणी राहिले नाही अशा परिस्थितीत वन्य प्राण्यांना पाणी कुठे आणि कसे उपलब्ध होईल असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पाण्याच्या शोधात हे प्राणी नागरी वसाहतीत शिरले तर परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता असल्याची भीती या भागातील रहिवासी आणि वन्यजीव प्रेमी निलेश कंचनपुरे यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना व्यक्त केली.
हेही वाचा - Pulwama Attack : पुलवामा हल्ला, सर्वात स्फोटक मुलाखत 'ईटीव्ही भारत'वर; सत्यपाल मलिक म्हणाले, 'मोदींनी त्यावेळी..'