अमरावती- 'स्वच्छ अमरावती, सुंदर अमरावती' अशी घोषणा देत अमरावती महापालिका प्रशासनाने शहराला सुंदर आणि स्वच्छ करायचे प्रयत्न चालविले. मात्र, स्वच्छतेच्या नावाखाली चक्क फोटोसेशन करून नौटंकी केल्याचा प्रकार समोर आला आहे.
अमरावती महापालिकेची स्वच्छता 'नौटंकी' - स्वच्छ अमरावती, सुंदर अमरावती
अमरावती शहरातील वडाळी परिसरात अतिशय खराब अवस्थेत असणाऱ्या सार्वजनिक शौचालयांना सकाळी रंगरंगोटी करण्यात आली. काही वेळातच सार्वजनिक शौचालयाचा परिसर स्वच्छ करण्यात आला. यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या नटवलेल्या सार्वजनिक शौचालयाचे फोटोसेशन केले.
अमरावती शहरातील वडाळी परिसरात अतिशय खराब अवस्थेत असणाऱ्या सार्वजनिक शौचालयांना सकाळी रंगरंगोटी करण्यात आली. काही वेळातच सार्वजनिक शौचालयाचा परिसर स्वच्छ करण्यात आला. याठिकाणी हात धुण्यासाठी बेसिन लावण्यात आले. तसेच साबण, डेटॉल यांची व्यवस्था हात धुण्यासाठी करण्यात आली. रंगीबिरंगी नवीन डस्टबिन, बकेट इथे ठेवण्यात आल्या. आपल्या परिसरातील सार्वजनिक शौचालय आता असे आधुनिक रूप घेत असल्याचा आनंद परिसरातील नागरिक व्यक्त करत होते. मात्र, महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या नटवलेल्या सार्वजनिक शौचालयाचे फोटोसेशन केले.
फोटोसेशन आटोपताच सार्वजनिक शौचालयाच्या ठिकाणी लावण्यात आलेले बेसिन काढण्यात आले. रंगीबिरंगी नव्या बकेटी, डस्टबीन उचलण्यात आले. त्यामुळे हा नेमका काय प्रकार सुरू होता हे परिसरातील नागरिकांना कळू शकले नाही. महापालिकेच्या आरोग्य अधिकार्यांपासून अनेकांना याबाबत विचारले असता, यावर स्पष्ट बोलण्यास कोणीही तयारी दर्शविली नाही. स्वच्छतेचा हा खोटेपणा, अशी नौटंकी अमरावती महापालिकेने नेमकी कशासाठी केली असावी? हा प्रश्न मात्र अनुत्तरित राहिला. हा खोटारडा प्रकार अमरावती महापालिकेची रँकिंग वाढविण्यासाठी करण्यात आला असेल, तर हे अतिशय गंभीर असल्याचे बोलले जात आहे.