अमरावती- आज होळीचा सण सर्वत्र साजरा केला जातो आहे, यात अमरावतीच्या खासदार नवनीत राणा व त्यांचे पती आमदार रवी राणा हे आदिवासी बांधवांसोबत होळी साजरी करण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात गेले असून खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी मेळघाटात आदिवासींसोबत होळी खेळण्याची आपली गेल्या 11 वर्षांपासूनची परंपरा जोपासली आहे.
आज मेळघाटातील गावात आदिवासी बालकांसोबत क्रिकेट खेळून खासदार नवनीत राणा यांनी मनसोक्त आनंद लुटला. मात्र, यावेळी राणा दाम्पत्याने कोरोना नियम धाब्यावर बसवले होते. दोघांनी तोंडाला मास्क बांधले नव्हते तर सुरक्षित अंतर यावेळी तीन तेरा वाजले होते. यावेळी नवनीत राणा यांच्या गोलंदाजीवर आमदार रवी राणा यांनी फलंदाजी केली. नवनीत राणा यांनी सुद्धा क्रिकेट पीचवर जोरदार फलंदाजी केली. राणा दाम्पत्याने यावेळी तुफान फलंदाजी करत क्रिकेटचा आनंद लुटला.