अमरावती-'जागतिक महिला दिनाच्या पर्वावर अमरावतीकरांची मान पुन्हा एकदा अभिमानाने उंचावली आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचा देशातील २५ श्रेष्ठ खासदारांमध्ये समावेश झाला आहे. एशिया पोष्ट व फेम इंडियाच्या सर्वेत संसदेतील कामगिरीच्या आधारे खासदार नवनीत रवी राणा यांनी हे पटकाविले स्थान आहे. हा गौरव माझा नसून मला निवडून देणाऱ्या तमाम मतदारांचा व माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे पती आमदार रवी राणा तसेच स्वाभिमानी शिलेदारांचा गौरव आहे, असे मत खासदार नवनीत राणा यांनी व्यक्त केले आहे.
एक सक्षम खासदार
अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार नवनीत रवी राणा यांच्या खासदरकीला आता १८ महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे. परंतू पदार्पणातच त्यांनी आपल्या नेतृत्वगुणांची चुणूक दाखवत जिल्ह्यातील, राज्यातील व देशातील विविध प्रश्न व समस्या अभ्यासपूर्ण पद्धतीने सभागृहात मांडून सभागृहाचे लक्ष वेधून घेतले. खासदार नवनीत राणा यांच्या या आक्रमक पवित्र्याची सभागृहसोबत, विविध प्रसारमाध्यमे, सामाजिक माध्यमे यांनी दखल घेतली व अल्पावधीतच त्यांची ओळख एक सक्षम खासदार म्हणून संपूर्ण देशात निर्माण झाली.