आमदार बच्चू कडू यांचा अपघात नागपूर -अमरावती जिल्ह्यातील अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बच्चू कडू यांचा आज सकाळी अमरावतीत भीषण अपघात झाला. या अपघातात बच्चू कडू यांच्या डोक्याला, पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येणार आहेत.
डोक्याला गंभीर दुखापत -मिळालेल्या माहितीनुसार बच्चू कडू सकाळी रस्ता ओलंडताना भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली. सुरुवातीला डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना अमरावती येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच प्रहारचे कार्यकर्ते तसेच त्यांच्या हितचिंतकांनी रुग्णालयात धाव घेतली. माजी राज्यमंत्री बच्चू कडू एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अमरावतीत आले होते.
डोक्याला,पायाला दुखापत -भरधाव दुचाकीने धडक दिल्यानंतर माजी मंत्री बच्चू कडू जखमी होऊन दुभाजकावर पडले. या अपघातात त्यांच्या डोक्याला तसेच पायाला दुखापत झाली आहे. त्यांना तातडीने येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
डोक्याला चार टाके -आमदार बच्चू कडू यांच्या डोक्याला चार टाके पडले आहे. दुखापत गंभीर स्वरूपाची आहे की, नाही हे जाणून घेण्यासाठी त्यांना नागपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आहे.
महिनाभरात अनेक आमदार जखमी -गेल्या 20 दिवसांच्या कालावधीत राज्यातील अनेक आमदार अपघातात जखमी झाले आहे. यामध्ये जयकुमार गोरे यांच्या वाहनाला भीषण अपघात झाला होता. नदीवरील पुलाचा कठडा तोडून आमदार जयकुमार गोरेंची कार 50 फूट खाली नदीत कोसळली होती. या अपघातात ते गंभीर जखमी झाले असून अजूनही त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस नेते माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या गाडीला परळीत अपघात झाला. त्यावेळी धनंजय मुंडेंच्या धनंजय मुंडे स्वतः गाडी चालवत होते. माजी मंत्री रामदास कदम यांचे पुत्र, आमदार योगेश कदम यांच्या गाडीला अपघात झाला. कदम यांच्या गाडीला डम्परने जोरदार धडक दिली होती. या धडकेत सुदैवाने योगेश कदम सुखरुप बचावले आहेत.