अमरावती - मेळघाटात सर्वात मोठा सण म्हणून होळी साजरी केली जाते. सलग पाच दिवस हा सण साजरा केला जात असताना या दरम्यान मेळघाटात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून फगावा अर्थात पैसे मागितले जातात. सध्या मेळघाटात रंग उधळून, पारंपरिक नृत्य आणि गीत गात रस्त्यावरून धावणाऱ्या गाड्यांना अडवून फगावा मागितला जातो आहे.
मेळघाटात अशी होते होळी साजरी
सातपुडा पर्वत रांगेत वसलेले आदिवासी बांधव परंपरेनुसार होळी सण साजरा करतात. रोजगारासाठी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर मंजुरीसाठी भटकंती करणारा मेळघाटातील प्रत्येक आदिवासी हा होळीनिमित्त मेळघाटात घरी परत येतो. होळीच्या दिवशी शेतात आलेल्या पिकाचे पूजन केले जाते. होळीच्या दुवशी सर्व गावकरी एका ठिकाणी येऊन होळी पेटवतात. यावेळी पारंपरिक नृत्यावर आदिवासी बांधव ताल धरतात. आदिवासींचे दैवत असणाऱ्या मेघनाथाचे पूजन होळीला केले जाते. मोहफुलांच्या रसापासून तयार करण्यात येणारी सिड्डू अर्थात दारू सर्व मिळून सेवन करतात. बासरी, कीनकी आणि ढोलकीच्या तालावर आदिवासी बांधव रात्रभर तल्लीन होऊन नृत्य करतात. दुसऱ्या दिवशी धुलीवंदनाला मासोळी, गोड पुरी, गोड भात असे जेवण केले जाते. होळी निमित्त मेळघाटात अनेक ठिकाणी यात्रा ही भरते.