अमरावती -कामना पूर्ण करणारी कामधेनू असा पुराणात उल्लेख असणाऱ्या गायीच्या सेवेत अमरावतीच्या गौरक्षण संस्थेने 130 वर्ष पूर्ण केले आहे. आजमितीस या संस्थेकडे 700 गोवंश असून गौ-सेवेचा आदर्श या संस्थेने समाजापुढे निर्माण केला आहे.
130 वर्षांपासून गौ सेवेचे व्रत 1891 ला झाली स्थापना -
स्वातंत्र्य सेनानी आणि अमरावती शहरातील नामवंत व्यक्तिमत्व अशी ओळख असणारे दादासाहेब खापर्डे यांनी 1891 ला अमरावतीच्या गौरक्षण संस्थेची स्थापना केली. अंबादेवी आणि एकविरा देवी मंदिर परिसरात त्यांनी गौरक्षण संस्था स्थापन केल्यावर 1910 पर्यंत ते या संस्थेचे अध्यक्ष होते. भटकलेल्या गायी, जखमी अवस्थेतील गायी तसेच कत्तलीसाठी जाणाऱ्या गायीची सेवा करणे. त्यांना वाचविणे, जगविणे हाच संस्थेचा मूळ उद्देश होता आणि आहे. आज ऍड. आर.बी. अटल हे संस्थेचे सातवे अध्यक्ष म्हणून संस्थेचे काम पाहत आहेत. या संस्थेत 220 सदस्य आहेत.
गौरक्षण संस्थेत 700 गोवंश -
या गौरक्षण संस्थेत एकूण 700 गोवंश आहेत. एकविरा देवी मंदिर परिसरामागे संस्थेच्या जागेवर 363 गोवंश आहेत, तर या संस्थेची दुसरी शाखा दस्तुरनगर चौक येथे असून त्याठिकाणी 337 गोवंश आहेत. या संस्थेकडे दोन बछडे आंधळे असून त्यांचीही योग्य सेवा केली जाते.
24 तास डॉक्टर उपलब्ध -
गोवंशाच्या सेवेसाठी संस्थेत 24 तास डॉक्टर उपलब्ध असल्याची माहिती संस्थेचे व्यवस्थापक रवींद्र तिवारी यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली. शहरात कुठेही गाय आजारी किंवा जखमी असल्याची माहिती मिळाली तर संस्थेच्या वाहनात टाकून त्यांना संस्थेत आणले जाते. तिच्यावर उपचार केले जातात आणि ती गाय ज्यांच्या मालकीचे असतो त्यांना ती परत केली जाते. असे तिवारी यांनी सांगितले.
वार्षिक खर्च 1 कोटी 60 लाख -
गायींना चारा, त्यांचे वेळोवेळी लसीकरण तसेच संस्थेच्या सर्व कामासाठी वार्षिक खर्च 1 कोटी 60 लाख रुपये येतो. यापैकी 90 टक्के रक्कम ही दान स्वरूपात संस्थेला प्राप्त होते. संस्थेकडे 25 एकर शेत आहे. या शेतात गायींसाठी लागणार चारा, मका, कुट्टी, ज्वारी दोन प्रकारचे गवत उगविले जाते. अनेक दान दाते त्यांच्या शेतातील कुटार संस्थेला देतात. संस्थेच्या परिसरात 5 गोदाम असून यामध्ये गायीसाठीचे खाद्य ठेवले आहे.
180 लिटर दुधाचे वितरण -
संस्थेतील 350 गायींपासून रोज जवळपस 180 लिटर दुध निघते. माफक दरात या दुधाचे वितरण केले जाते. कुठलीही भेसळ न करता मिळणारे हे दूध लहान मुलांसाठी अतिशय पौष्टिक असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. दुधासोबतच तूप, गोमूत्र, गौ-अर्क, शेणापासून बनविलेल्या गौऱ्या या संस्थेच्या विक्री केंद्रात अतिशय स्वस्त दरात उपलब्ध आहेत. या ठिकाणी शेणखत सुद्धा निर्माण केले जाते. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना स्वस्त दरात शेणखत उपलब्ध करून दिले जाते.
कौटुंबिक कार्यक्रमातून जनजागृती -
गौरक्षण संस्थेच्या परिसरात श्री कृष्णचे मंदिर आहे. अनेक भाविक मंदिरात येतात. गायींसाठी खायला सुद्धा आणतात. गौसेवेबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने संस्थेकडून नागरिकांना या परिसरात वाढदिवस तसेच इतर लहानसहान कार्यक्रम करण्याचे आवाहन केले जाते. याद्वारे नागरिक याठिकाणी कार्यक्रम साजरे करता आणि गोसेवेसाठी संस्थेला दानही देतात.