अमरावती -कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी, शेतकऱ्यांना बैलांचे पूजन घरीच करून पोळा साजरा करावा लागला. या वर्षी तरी शेतकऱ्यांच्या सर्जाराजाला सन्मानपूर्वक तोरणा खाली नेण्याची संधी मिळणार की नाही या संभ्रमात शेतकरी होते. मात्र, प्रशासनाने कोरोना संदर्भात शासनाने आखून दिलेल्या नियम व अटींचे पालन करून, घरीच पोळ्याचा सण साजरा करण्याचे आवाहन केल्याने सलग दुसऱ्या वर्षीही बैलांचे पोळ्याच्या तोरणा खाली पूजन झाले नाही. त्यामुळे शासनाच्या निर्णयावर अमरावतीमधील शेतकऱ्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली. सरकारच्या भूमिपूजन कार्यक्रमांमुळे कोरोना पसरत नाही मग आम्हा कष्टकरी शेतकऱ्यांच्या फक्त एका पोळा सणामुळे तुम्हाला कोरोना होतो का? असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
सर्जाराजाचे घरीच पूजन -
जिल्हा प्रशासनाने काढलेल्या या आदेशाचे पत्रक, ग्रामपंचायतीपर्यंत पोहोचले. त्या अनुषंगाने पोळा सार्वजनिकरीत्या गर्दी करून साजरा न करता, शेतकऱ्यांनी घरीच साजरा करावा, अशा सूचना काही ठिकाणी शनिवारीच देण्यात आल्या. प्रशासनाच्या या आदेशामुळे आता शेतकऱ्यांना आपल्या सर्जाराजाचे घरीच पूजन करावे लागले. त्यानंतर त्यांना गोठ्यातच बांधून ठेवावे लागले. परिणामी या वर्षीही कोरोनामुळे बैल सार्वजनिक पूजनाला मुकले.