अमरावती -माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने आज बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. कोरोनाच्या संकट काळात प्रत्यक्षात इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा घेतली गेली नसली तरी संबंधित विद्यार्थ्याला दहावी आणि अकरावीमध्ये मिळालेले गुण तसेच इयत्ता बारावीतील विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनाच्या आधारावर हा निकाल घोषित करण्यात आला.
अमरावती विभागाचा निकाल 99.37 टक्के -
अमरावती विभागाचा यावर्षी बारावीचा निकाल 99.99% लागला आहे. राज्यात निकालाच्या टक्केवारीत अमरावती जिल्ह्याचा क्रमांक 8 व्या स्थानावर आला आहे. अमरावती विभागातून इयत्ता बारावी ला 1 लाख 31हजार 989 विद्यार्थी होते यापैकी 1 लाख 31 हजार 989 विद्यार्थ्यांचे मूल्यांकन शिक्षण मंडळाला प्राप्त झाले असून त्यातून 1 लाख 31हजार 166 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. अमरावती विभागातील अकोला जिल्ह्याचा निकाल 99.26 टक्के, अमरावती जिल्ह्याचा निकाल 99.29 टक्के, यवतमाळ जिल्ह्याचा निकाल 99.77 टक्के, बुलडाणा जिल्ह्याचा निकाल 99.47 टक्के आणि वाशिम जिल्ह्याचा निकाल 98.89 टक्के लागला आहे.
अमरावती विभागात 823 विद्यार्थी अनुत्तीर्ण
कोरोना काळात इयत्ता बारावीची लेखी परीक्षा घेतली नसली तरीही अमरावती विभागात इयत्ता बारावी ला बसलेले 823 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. यापैकी अकोला जिल्ह्यातील 170, अमरावती जिल्ह्यातील 236, बुलढाणा जिल्ह्यातील 159, यवतमाळ जिल्ह्यातून 63 आणि वाशिम जिल्ह्यातील 195 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांबाबत खरतर कुठलीही माहिती उपलब्ध नसल्यामुळे त्यांचा निकाल अनुत्तीर्ण आला असल्याची माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अमरावती विभागाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली.
असे झाले मूल्यांकन
इयत्ता बारावीची परीक्षा घेतली नसताना विद्यार्थ्यांचा निकाल लावण्यासाठी दहावी आणि अकरावी तील बेस्ट थ्री विषयात मिळालेल्या एकूण गुणांच्या टक्केवारी पैकी प्रत्येकी तीस टक्के गुण गृहीत धरण्यात आले. तसेच इयत्ता बारावीत ऑनलाइन शिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांनी केलेला अभ्यास, प्रात्यक्षिक,तोंडी परीक्षा त्यांचे 40 टक्के गुण पकडून विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करण्यात आले अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अमरावती विभागाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली.