अमरावती Amravati Crime :अमरावतीयेथील जिल्हा सत्र न्यायालयात एका प्रकरणामध्ये जबाब देऊन अंजनगाव सुर्जी या आपल्या गावी कारने परतणाऱ्या चौघांवर दर्यापूर अंजनगाव सुर्जी मार्गावर गुरुवारी (7 डिसेंबर) रात्री गोळीबार करण्यात आला. तेजस्वी विश्वजीत राणे, रामकृष्ण सोळंके, अनिता रामकृष्ण सोळंके, आणि गजानन सुधाकर घोरपडे, असं या घटनेत जखमी झालेल्यांची नावं आहेत. या घटनेमुळं दर्यापूर आणि अंजनगाव सुर्जी तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडालीय.
कशी घडली घटना :अंजनगाव सुर्जी येथील रहिवासी असलेले चौघं जण एका प्रकरणात जबाब देण्यासाठी गुरुवारी अमरावती जिल्हा सत्र न्यायालयात आले होते. सायंकाळी आपल्या गावी परतत असताना एक बीएमडब्ल्यू कार त्यांच्या गाडीचा पाठलाग करत असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. त्यानंतर त्यांनी तातडीनं पोलिसांना फोन करत याची माहिती दिली. यानंतर लगेच वलगाव पोलिसांनी त्यांच्या कारला संरक्षण देत कोल्हापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीपर्यंत सोडलं. पुढं कोल्हापूर पोलिसांनी त्यांना दर्यापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीपर्यंत सोडलं.
बीएमडब्ल्यूमधून आलेल्या युवकांनी केला गोळीबार-दर्यापूर पोलिसांना यायला उशीर लागल्यामुळं तितक्या वेळात बीएमडब्ल्यू कारमध्ये असलेल्या युवकांनी कारवर देशी कट्ट्यातून गोळ्या झाडल्या. या घटनेत तेजस्वी राणे यांच्या डाव्या कानाला गोळी लागली. तसंच इतर जणं जखमी झाले. त्यानंतर दर्यापूर पोलीस घटनास्थळी पोहोलचे . त्यांनी लगेच जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं. तर तेजस्वी राणे यांची प्रकृती गंभीर असल्यानं त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.