अमरावती Amravati Crime :अमरावतीजिल्ह्यातील परतवाडा येथील आझाद नगर परिसरात एका व्यक्तीच्या घरात तब्बल 33 जिवंत गावठी बॉम्ब सापडले आहेत. दरम्यान, हे बॉम्ब जप्त करण्यात आले असून याप्रकरणी जयपाल सिंह सोहन सिंह बावरी याला अटक करण्यात आलीय.
अशी झाली कारवाई :परतवाडा शहरातील आझाद नगर परिसरातील एका घरात स्फोटक पदार्थ असल्याची माहिती त्या भागात पेट्रोलिंग करत असणाऱ्या पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर पोलीस पथकानं जयपाल सिंह सोहन सिंह बावरी नावाच्या व्यक्तीच्या घरावर छापा मारला. यावेळी त्यांना 33 जिवंत गावठी बॉम्ब आढळून आले. त्यानंतर जयपाल सिंह सोहन सिंह बावरी यास पोलिसांनी ताब्यात घेतलं. दरम्यान, सदरील कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद आणि अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पवार, अंमलदार युवराज मानमोठे, रवींद्र वराडे, स्वप्निल तवर, सागर नाठे, शांताराम सोनवणे, मंगेश मानमोडे यांनी केली.
जंगली डुक्कर मारण्यासाठी वापर :शेतात धुमाकूळ घालणाऱ्या जंगली डुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी अशा प्रकारचे गावठी बॉम्ब अनेक शेतकरी वापरत असल्याची माहिती समोर आली आहे. या गावठी बॉम्बचा वापर जनावरांच्या शिकारीसाठी केला गेला का? याचा तपास देखील पोलीस करणार आहेत.
27 जिवंत गावठी बॉम्बसह दोघांना अटक :काही दिवसांपूर्वी परतवाडा पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं शहरातील अंजनगाव स्टॉप येथे रानडुकराची शिकार करणाऱ्या दुचाकीवरील दोघांना 27 जिवंत गावठी बॉम्ब आणि मृत रानडुकरासह अटक केली होती. यावेळी चांदचौदसिंग कनीसिंग बावरी, अशोक सावळाराम शिंदे यांना अटक करून त्यांच्याविरुद्ध परतवाडा पोलीस ठाण्यात भादंविचे कलम 286, सहकलम 3 (ए), 5 स्फोटक पदार्थ अधिनियम 1908 आणि कलम 939 वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 कलम 3, 5, 25, 27 शस्त्र अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.