महाविद्यालयात साकारला बायोगॅस,वर्षाकाठी होत आहे लाखोंची बचत अमरावती:भारताचे पहिले कृषिमंत्री पंजाबराव देशमुख यांनी स्थापन केलेल्या श्री शिवाजी कला वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी पर्यावरण वाचवा देश वाचवा, वृक्ष संवर्धन करा, असे धडे विद्यार्थ्यांना देतात. तसेच बायोगॅस, सौर ऊर्जा, वृक्ष संवर्धन असे एका पाठोपाठ तीन पर्यावरण पूरक मॉडेल निर्माण करून विद्यार्थ्यांपुढे एक आदर्श ठेवला आहे. नोव्हेंबर 2021 पासून या महाविद्यालयात डॉ. रामेश्र्वर भिसे रुजू झाले. त्यांनी महाविद्यालयाचे रूपडं पालटायला सुरुवात केली आहे.
वर्षाकाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक बचत: या बायोगॅस प्रकल्पाविषयी माहिती देताना प्राचार्य डॉ. भिसे यांनी सांगितले की, डॉ. पंजाबराव भाऊसाहेब देशमुख यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयामध्ये पर्यावरण पूरक कार्यक्रम राबवला जातो. त्याचाच एक भाग म्हणून मुलींच्या वस्तीगृहात हा बायोगॅस प्रकल्प कार्यान्वित केला आहे. महाविद्यालयामध्ये शंभर मुलींचे वस्तीगृह आहे. त्या ठिकाणी त्यांची खानावळ आहे, खानावळ मधून उरलेले व शिळे अन्न तसेच इतर स्वयंपाक गृहातून निघालेल्या टाकाऊ पदार्थ एका टॅंकमध्ये टाकले जाते. या बायोगॅसपासून शंभर मुलींचा चहा, नाश्ता तसेच अंघोळीसाठी लागणारे गरम पाणी याकरिता या बायोगॅसचा वापर केला जातो. या बायोगॅसपासून वसतिगृहातील अन्न शिजवणे सोपे झाले आहे. तसेच आता महिन्याला लागणाऱ्या गॅस सिलेंडरमध्ये बचत होते. त्यामुळे वस्तीगृहाची वर्षाकाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक बचत होईल.
महाविद्यालयात गुलाबांची बगीचा: तीन हजार विद्यार्थी संख्या असलेल्या या महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेचे पथक आहे. या माध्यमातून महाविद्यालयाच्या परिसरात विद्यार्थ्यांनी गुलाब बगीचा फुलवली आहे. गुलाबी फुलांची ही बगीचा विद्यार्थी आणि महाविद्यालयात येणाऱ्या जाणाऱ्याचं एक विशेष आकर्षण ठरत आहे. तसेच पावसाळ्यात महाविद्यालयाच्या छतावरून जमा होणारे सर्व पाणी रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून संकलित करून विहिरीचे पुनर्भरण करण्यात येते.
शेततळे खोदण्यात आले: रेन वॉटर हार्वेस्टिंगमुळे जुलै महिन्यात पाण्याची पातळी तीन फुटापर्यंत येते, तर सध्या ती आठ फुटावर आहे. महाविद्यालयाच्या दहा एकर परिसरातील जागेचा उतार असलेल्या एका ठिकाणी अमरावती महानगरपालिकेच्या माध्यमातून 60 x 60 या आकाराचे एक शेततळे खोदण्यात आले आहे. पावसाळ्यात सर्व पाणी त्या ठिकाणी जमा होते. पाण्याची पातळी आता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. महाविद्यालयाच्या परिसरात २०० झाडांची लागवड केली असून त्यांचे संवर्धन केले जाते.
वर्षाकाठी 5 लाखाची बचत:संस्थेच्या मदतीने महाविद्यालयात 15 किलो वॅटची सौर ऊर्जा प्रणाली बसवण्यात आली आहे. अगोदर महाविद्यालयाचे वापराचे महिन्याला 60 हजार रुपये वीजबिल येत होते. परंतु सौर ऊर्जेमुळे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात बचत झाली आहे. आता महिन्याकाठी फक्त 22 हजारापर्यंत वीजबिल येते. त्यामुळे महाविद्यालयाची प्रति महिना 36 ते 40 हजार रुपये पर्यंत बचत होते असे प्राचार्यांनी सांगितले.
बायोगॅस म्हणजे काय?:बायोगॅस म्हणजे जैविक प्रक्रियांमधून बाहेर पडणारा वायू आहे. जर एखादी जैविक प्रक्रिया ऑक्सिजन विरहित वातावरणात झाली तर, बायॉगॅसची निर्मिती होते. सेंद्रिय पदार्थाचे जीवाणूद्वारे हवाविरहित अवस्थेत झालेल्या विघटनानंतर निर्माण होणारा वायू साठविण्यासाठी तयार करण्यात आलेल्या साधनास बायोगॅस सयंत्र म्हणतात. यात मिथेन व कार्बन-डाय- ऑक्साईड हे वायू तयार होतो. मिथेन हा वायू ज्वलनास मदत करतो. बायोगॅस गॅसिफायरमधून तयार होणारा प्रोड्युसर गॅस पाणी उपसण्यासाठी, वीजनिर्मितीसाठी, तसेच स्वयंपाकासाठी देखील वापरला जातो. बायोगॅस गॅसिफायर सयंत्र विविध कार्यक्षमतेमध्ये उपलब्ध असून गरजेप्रमाणे त्यांचा वापर करता येतो. बायोगॅसमध्ये साधारणपणे ५५ ते ६० टक्के मिथेनचे प्रमाण असते. तर उर्वरित भाग कार्बन डायॉक्साईडचा असतो. मिथेन हा ज्वलनशील असल्याने बायोगॅस पण ज्वलनशील असतो. परंतु कार्बन डायॉक्साईड या अज्वलनशील वायूमुळे याची ज्वलन उष्णता शुद्ध मिथेनपेक्षा कमी असते. बायोगॅस हा नमूद केल्याप्रमाणे ज्यांना आपण कुजणे म्हणतो अशा जैविक प्रक्रियांमधून निर्माण होतो. बहुतांशी कुजणाच्या प्रक्रियांमध्ये बायोगॅसची निर्मिती होते.
हेही वाचा: Amla Vishweshwar आमला विश्वेश्वर येथे अनोखी यात्रा महाप्रसादाला 100 क्विंटलची भाजी एकाचवेळी बसते दोन ते अडीच हजार जणांची पंगत