अमरावती -अमरावती शहरापासून काही अंतरावर असणाऱ्या भिवापूरकर तलाव मुसळधार पावसामुळे तुडुंब भरला आणि तलावाला इंग्रज काळापासून असणाऱ्या भिंतींना तडा गेल्यामुळे परिसरातील आराड, कुऱ्हाड, उदखेड, पारडी या गावांना धोका निर्माण झाला. गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला संकट डोळ्यासमोर दिसताच ग्रामस्थांनी गुरूवारची संपूर्ण रात्र जागून काढली. शुक्रवारी जिल्हा प्रशासनाच्यावतीने दोन जेसीबीच्या साह्याने तलावाला इंग्रज काळापासून असणारा मजबूत फाड्यांचा बांध फोडून तलावातील पाणी नाल्याद्वारे बाहेर काढल्याने परिसरातील गावांच्या तोंडावर असणारे संकट निवळले.' श्री गणेशा पावला' असे म्हणत ग्रामस्थांनी मोठे संकट टळल्याचा आनंद व्यक्त केला.
गावखाली करण्याच्या आदेशामुळे ग्रामस्थांमध्ये खळबळ -
गत चार दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे भिवापूरकर तलाव तुडुंब भरला. शुक्रवारी सायंकाळी आराड या गावातील काही युवक गावापासून जंगलात दोन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या भिवापूरकर तलावाचे पाणी पाहण्यासाठी गेले होते. यावेळी गावाच्या दिशेने तलावाला लागून असणारी दीडशे वर्ष जुन्या मातीच्या भिंतीला तडे गेले असून अनेक ठिकाणी खोल खड्डे पडल्याचे दिसून आले. युवकांनी भिंतीला पडलेल्या तड्यांचे तसेच खड्ड्यांचे फोटो काढून गावात परतल्यावर ग्रामस्थांना दाखवल्यावर गावात खळबळ उडाली. याबाबत माहिती मिळताच आमदार रवी राणा हे आराड या गावात पोहोचले. रात्री तलाव परिसरात जाणे अशक्य असल्यामुळे आमदार राणा यांनी तलाव फुटण्याचा धोका व्यक्त करताच ग्रामस्थ हादरले. दरम्यान कुठलीही अप्रिय घटना घडू नये, यासाठी प्रशासनाच्या वतीने आराड, कुराड, ऊदखेड, पारडी या गावातील ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन करताच ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली.
पाणीपुरवठ्यासाठी बांध तयार केल्याने ओढावले संकट -
भिवापुरकर तलाव हा वनविभागाच्या हद्दीत येतो. या तलाव परिसरातून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन थेट तलावातून नेली. असे करत असताना इंग्रजांनी तलावातील पाणी बाहेर काढण्यासाठी जो खोल भाग तयार केला होता, त्या भागाला उंच करण्यात आले. यामुळे तलावात क्षमतेपेक्षा अधिक साठणारे पाणी सहज बाहेर निघण्याचा मार्ग बंद झाला. आणि हे पाणी गावाच्या दिशेने असणार्या भिंतीवरून वाहून आल्याने दीडशे वर्षात पहिल्यांदा तलावालगतच्या गावांवर संकट कोसळले अशी माहिती काही ग्रामस्थांनी 'ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.
तलाव परिसरात जाण्यासाठी ट्रॅक्टरची व्यवस्था -