अमरावती - कोरोना काळात आरोग्य विभागासोबत खाांद्याला खांदा लावून आशा सेविकांनी काम केले. मात्र, त्यांना केवळ महिन्याचे एक हजार रुपये मानधन मिळते. मानधनात वाढ व्हावी या मागणीसाठी तीन दिवसांपासून आशा सेविका आमरण उपोषण करत आहेत. मात्र, तरीही कुणी दखल घेत नसल्याने आशा सेविकांनी गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या दिला.
आशा सेविका शिरल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात! - अमरावती आशा सेविका न्यूज
कोरोना काळात राज्यातील आशा सेविका घरोघरी जाऊन सर्वेक्षणाचे काम करत आहे. मात्र, शासनाकडून या कामाचा त्यांना योग्य मोबदला दिला जात नाही, असा आरोप या सेविकांचा आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी अमरावतीतील आशा सेविकांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.
घरोघरी जाऊन माहिती गोळा करताना काही आशा सेविकांना कोरोनाची लागण झाली तर काहींचा मृत्यू देखील झाला. म्हणून या आशा सेविकांनाही अंगणवाडी सेविकांप्रमाणे मानधन द्यावे व कोविडच्या काळात तीनशे रुपये भत्ता देण्यात यावा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आशा सेविकांचे तीन दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. मात्र, कोणीही त्यांच्या आंदोलनाची दखल घेतली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या आशा सेविकांनी आक्रमक होत जिल्हाधिकाऱयांच्या दालनाचा ताबा घेतला. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत जिल्हाधिकाऱयांचे दालन सोडणार नाही, असे धोरण आशा सेविकांनी घेतले. जिल्हाधिकारी शैलेश नवाल हे यावेळी दालनात उपस्थित नव्हते.
आम्हाला न्याय मिळावा यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत. आमच्यापैकी काहींची प्रकृती खालावली असतानाही प्रशासन आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचे दुःख होत असे म्हणत आशा सेविका रेश्मा भोंगडे यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली. दरम्यान, आशा सेविका जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात शिरल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात तैनात असलेल्या पोलिसांची तारांबळ उडाली.