अमरावती- शहरात नातेवाईकाकडे असणाऱ्या लग्नात सहभागी होण्यासाठी एक कुटुंब ऑटोरिक्षानं अमरावतीला येत असताना भीषण अपघात झाला. त्यांच्या ऑटोरिक्षाला ट्रकनं धडक दिली. या अपघातात दोन युवती आणि एका पुरुषासह तिघेजण जागीच ठार झाले आहेत.
लग्न सोहळ्यात येत असताना झाला अपघात-पूजा सहदेव वाकोडे (16), प्रज्ञा महादेव वाकोडे (19) आणि पद्माकर देविदास दांडगे( 50) असे अपघातात ठार झालेल्या तिघांची नावं आहेत. तर साहेबराव वाकोडे (52) फुलवता वाकोडे (49) करुणा वाकोडे (17) आणि रंजिता दांडगे (40) अशी जखमींची नावे आहेत. हे सर्व चिंचोली काळे येथील रहिवासी आहेत. वाकोडे आणि दांडगे कुटुंब अमरावती शहरात एका लग्न सोहळ्यात सहभागी होण्यासाठी येत असताना मार्गात नांदुरा येथील पुलाजवळ ट्रकने त्यांच्या ऑटोरिक्षाला जोरदार धडक दिली.
पोलिसांनी घेतली घटनास्थळी धाव-नांदुरा येथील पुलाजवळ भीषण अपघात झाल्याची माहिती मिळताच वलगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. नांदुरा येथील रहिवाशांनी देखील घटनास्थळी एकच गर्दी केली. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने अपघातातील सर्व जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी पूजा प्रज्ञा आणि पद्माकर यांना मृत घोषित केले. अपघातातील इतर सर्व जखमींवर उपचार सुरू आहेत. वलगाव पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.
मुंबईतील अपघातात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू-सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्त (एसीपी) मोहम्मद जावेद (७२) यांचा वाहन अपघातात मृत्यू झाला. शिवरी भागात एका मद्यधुंद चालकानं चालविलेल्या वेगवान टॅक्सीनं फेरफटका मारणाऱ्या मोहम्मद जावेद यांना धडक दिल्याचे पोलिसांनी सांगितले. हा अपघात मंगळवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास भाऊचा धक्का जेट्टीजवळील वाय जंक्शनजवळ झाला. जावेद यांना पोलीस वाहनातून जे. जे. रुग्णालयात नेण्यात आले. परंतु रुग्णालयात दाखल करताच त्यांना मृत घोषित करण्यात आले.