अमरावती -जिल्ह्यातील कोरोनाची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता जिल्ह्यातील सर्व दुकाने, मॉल, हॉटेल, चहा नाष्टा गाड्या, बाजारपेठ, आदी आस्थापने रात्री आठ वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले आहेत. यानंतर आता अमरावतीतील प्रसिद्ध अंबा देवीचे मंदिरही दररोज रात्री साडेसात वाजताच बंद करण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे. रविवारी लॉकडाऊन असल्याने मंदिरही पूर्णतः बंद राहणार असल्याची माहितीही मंदिर प्रशासनाने दिली आहे.
आजपासून 36 तासांचा लॉकडाऊन -
अमरावती जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता लॉक डाऊन सुरू झाला आहे. शनीवारी रात्री आठपासून सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत 36 तासांचा हा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील दुकाने मॉल्स, हॉटेल हे रात्री आठ वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहे. त्यामुळे आता अंबा देवीचे मंदिरही दररोज रात्री साडेसात वाजताच बंद होणार आहे.