अमरावती- जिल्ह्यात दररोज 70 ते 80 कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहे. कोरोनाची दुसरी लाट अधिक घातक असणार असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी अमरावतीकारांनो सज्ज व्हा, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे.
कोरोनाची दुसरी लाट येण्याची दाट शक्यता आहे. यासंदर्भात आरोग्य विभागासह जागतिक आरोग्य संघटनेने इशारा दिल्याचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी म्हटले आहे.
दीड महिना सतर्कतेचा
सण उत्सवांचा काळ आता संपला आहे. लग्न समारंभाची धामधूम आता सुरू होणार आहे. याच काळात कडाक्याची थंडी पडणार असल्याने हृदय आणि यकृताचे आजार असणाऱ्या व्यक्तींनी कोरोनापासून बचावासाठी अधिक काळजी बाळगणे अत्यावश्यक राहणार आहे. थंडीचा हा दीड महिना सतर्कतेचा राहणार असे जिल्हाधिकारी म्हणाले.
कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता; अमरावतीकरांनो सज्ज व्हा- जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
कोरोनाची दुसरी लाट येण्याची दाट शक्यता आहे. यासंदर्भात आरोग्य विभागासह जागतिक आरोग्य संघटनेने इशारा दिल्याचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी म्हटले आहे.
जिल्ह्यात 17 हजार 212 रुग्ण-
अमरावतीत आज 99 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. जिल्ह्यात एकूण 17 हजार 212 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला. सध्या 10 कोविड रुग्णालयांसह जिल्ह्यातील एकूण 16 कोविड हेल्थ केअर सेंटरमध्ये एकूण 1 हजार 423 खाटा आहेत. त्यापैकी 1 हजार 266 खाटा रिक्त असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
शाळा पूर्णवेळ नाही-
सोमवारपासून नववी ते बाराव्या वर्गापर्यंत शाळा सुरू होणार आहे. मात्र, ही शाळा पूर्णवेळ नसेल. गणित व विज्ञान या विषयात विद्यार्थ्यांना असणाऱ्या अडचणी सुटाव्या यासाठी शाळा सुरू होणार आहे. एक दिवसाआड वर्ग अशा पद्धतीने शाळा सुरू होईल. दिवसभर शाळा न राहता दोन-तास शाळा सुरू राहिल, असे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले.