अमरावती- कोरोनाच्या संकटाने संपूर्ण जगाला ग्रासले असताना वैद्यकीय शिक्षणासाठी फिलीपाईन्स या देशात गेलेल्या अमरावती आणि अकोला शहरातील अनेक विद्यार्थी तेथे अडकून पडले आहेत. आमची मदत करा आम्हाला मायदेशी परत नेण्याची व्यवस्था करा, अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे.
फिलीपाईन्समध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांनी हाक फिलीपाईन्समध्ये शिक्षणासाठी गेलेल्या विदर्भातील विद्यार्थ्यांची संख्या तीनशेच्या आसपास असल्याची माहिती आहे. यापैकी अमरावतीच्या अमित मारोटकर, प्रज्वल पचगाडे, पीयुष चौधरी आणि अजित मडगे यांच्यासह अकोला शहरातील राहुल सराफ, नुकूल चव्हाण, तन्मय बडगुजर, कोमल पांडे आणि ऋषी ढोणे यांनी 'ई टीव्ही भारत'शी संपर्क साधून आपल्या वेदना व्यक्त केल्या आहेत.
फिलीपाईन्सची राजधानी मनिला या शहरात हे सर्व विद्यार्थी आहेत. ते फिलीपाईन्सच्या आमा विद्यापीठात वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेले आहेत. सध्या कोरोनामुळे मनिला शहरासह संपूर्ण फिलीपाईन्स लॉकडाऊन आहे. या विद्यार्थ्यांच्या खानावळी बंद झाली आहे. संचारबंदी असल्याने घराबाहेर पडता येत नाही. त्यामुळे अनेक अडचणी त्यांच्यासमोर उभ्या ठाकल्या आहेत. आमची भारतात जाण्याची व्यवस्था फिलिपाईन्समध्ये असणाऱ्या भारतीय दुतावासाने करून द्यावी, अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे. भारत सरकारने फिलिपाईन्समधून भारताकडे येणारी विमानसेवा रद्द केली असल्याने फिलीपाईन्समध्ये अनेक विद्यार्थी अडकून पडले आहेत. तसेच काही विद्यार्थ्यांचा व्हिसा संपल्याने त्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.
भारत सरकारने आम्हाला मायदेशी आणण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे. यासाठी येणारा सर्व खर्च करण्याची आमची तयारी आहे. भारतात आणल्यावर त्यांना कुठेही विलगीकरण कक्षात ठेवा. त्यांच्या सर्व चाचणी करा, असे या विद्यार्थ्यांच्या पालकांचे म्हणणे आहे.
हेही वाचा -लॉकडाऊन : वाजंत्री व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ; लग्न समारंभ रद्द झाल्याने आर्थिक फटका