अमरावती- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अमरावती विमानतळ विस्तारीकरणाचे भूमिपुजन झाले. अमरावती विमानळाची 1372 मीटरची धावपट्टी 1850 मीटरपर्यंत वाढण्यात येणार आहे. अनेक महत्वाची कामे झपाट्याने पूर्ण केली जाणार असून 2020 मध्ये अमरावती विमानतळावरून प्रवासी विमान हवेत झेपावेल, अशी माहिती महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष संतोष काकाणी यांनी दिली.
2020 मध्ये झेपावणार अमरावतीतून प्रवासी विमान - Devendra Fadanvis
विमानतळ तयार करून देणे आमचे काम असून काम पूर्ण होताच विमानसेवा कंपन्याकडून प्रवासी सेवा देण्याचा परवाना मिळेल. त्यानंतर 15 दिवसात अमरावती विमानतळावरून प्रवासी विमान झेपावेल. या विमानतळाला लोकाश्रय, प्रवाशांचा प्रतिसाद मिळावा, अशी आशा संतोष काकाणी यांनी व्यक्त केली.
विभागीय शहर असणाऱ्या अमरावतीतून प्रवासी विमान सुरू व्हावे, यासाठी अमरावतीकर बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा करत आहेत. अमरावती विमानतळाच्या विस्तारीकरणाला सुरुवात झाली असून शासनाकडून 75 कोटी रुपये मिळाले आहेत. या निधीतून धावपट्टीच्या रुंदीकरणासोबतच टॅक्सी वे, दोन पार्किंग रस्ते, विमानतळाच्या आता सुरक्षेसाठीचा मार्ग निर्माण केला जाणार आहे.
विमानतळ परिसर झाडे लावून हिरवागर केला जाणार आहे. विजेची बचत होण्यासाठी सोलर युनिट विमानतळाच्या इमारतींवर लावण्यात येईल. या अतिरिक्त कामांसाठी आणखी 40 कोटी हवे आहेत जे सरकार लवकरच देणार आहे, अशी माहिती संतोष काकाणी यांनी दिली.