अमरावती :राज्यस्तरीय आमदार चषक स्पर्धेतून शहरात रंगणार कबड्डीचा थरार १७, १८ व १९ फेब्रुवारी २०२३ ला पहायला मिळणार आहे. ७० वी राज्यस्तरीय अजिंक्यपद कब्बडी स्पर्धा आमदार सुलभाताई खोडके यांच्या मार्गदर्शनातून पार पडणार आहे. यश खोडके यांच्या संकल्पनेतून अमरावती जिल्हा कबड्डी असोशिएशनचे दमदार आयोजन करण्यात येणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन सिने अभिनेत्री सई मांजरेकर हिच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्यामुळे सई मांजरेकर विशेष आकर्षण राहणार आहे. बदलत्या काळात अनेक खेळाचे स्वरूप बदलले आहे. विविध इनडोअर व आऊट डोअर खेळांनी अवघे विश्व व्यापले आहे. याला क्रीडा प्रेमींचा सुद्धा प्रतिसाद लाभत आहे. ही बाब प्रशंसनीय व स्वीकारार्ह असली तरी मातीशी जुळलेले अनेक पारंपरिक मैदानी खेळ आज केवळ मागे पडत नसून ते लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत.
सई मांजरेकरच्या हस्ते उद्घाटन : लुप्त होण्याच्या मार्गावर असलेल्या खेळांमध्ये एक म्हणजे कबड्डीचा खेळ. देशातील विविध राज्यात खेळल्या जाणाऱ्या कबड्डीच्या खेळाची महाराष्ट्राचा पारंपरिक व सांस्कृतिक खेळ म्हणून ओळख आहे. तरीही आज याचे खेळाडू व प्रेक्षक सुद्धा कव्चितच बघायला मिळतात. म्हणूनच कब्बडी सारख्या अस्सल मैदानी व मर्दानी खेळाचे जतन व्हावे, कबड्डीला गत वैभव प्राप्त व्हावे, तसेच अमरावतीच्या मातीतून राष्ट्रीय व आंतर राष्ट्रीय दर्जाचे कबड्डीपटू उदयास यावेत यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यासोबचत महिला खेळाडूंचा सुद्धा यात सहभाग वाढावा, या उदात्त हेतूने सुलभाताई संजय खोडके यांच्या मार्गदर्शनात अमरावती जिल्हा कबड्डी असोशिएशन अमरावतीच्यावतीने राज्यस्तरीय अजिंक्यपद कब्बडी स्पर्धा आमदार चषक २०२३ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे.