अमरावती :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलरची करायची आहे. आपल्या देशाची आर्थिक राजधानी मुंबई आहे. त्यामुळं देशाच्या अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राचा वाटा खूप महत्त्वाचा आहे. देशाच्या एकूण पाच ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेपैकी महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरवर नेण्याचा आमचा मानस आहे, असं प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय. ते अमरावती येथील सायन्सकोर मैदानावर क्रेडाईतर्फे आयोजित प्रॉपर्टी एक्स्पो समारंभात बोलत होते. राज्याचं आर्थिक चक्र नीट चालू ठेवायचं असेल, तर बांधकाम क्षेत्राची भूमिका खूप महत्त्वाची आहे, असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं.
वाळू ऐवजी क्रश सैंडचा वापर :आज अमरावतीसह राज्यभरातील बांधकाम व्यावसायिकांना वाळूची समस्या भेडसावत आहे. त्यामुळं राज्यभरातील बांधकाम व्यवसायात मोठ्या अडचणी निर्माण झाल्याचं दिसून येत आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील मंत्रिमंडळात वाळूप्रश्नाचा मुद्दा उपस्थित करत आहेत. मात्र, पर्यावरणाचाही विचार केला पाहिजे, असं पवार म्हणाले. तसंच ग्लोबल वॉर्मिंगचा विचार करता वाळूऐवजी क्रश सँड वापरायला हवी, असं देखील त्यांनी सांगितलं. क्रेडाई प्रमुख सतीश मगर यांनी 450 एकरचं पहिलं मगरपट्टा शहर संपूर्णपणं क्रशनं बांधलं आहं. घराचं प्लॅस्टरही क्रशनं केलंय. पुण्यातील नांदेड सिटीतील 750 एकरांवर काम क्रशमध्ये सुरू आहे. त्यामुळं अमरावतीसह संपूर्ण राज्यातील बांधकाम व्यावसायिकांनी आता वाळूऐवजी क्रशचा वापर करावा, असंही अवाहन अजित पवार यांनी केलंय.