लातूर - जिल्ह्यात खरीप हंगामासाठी रासायनिक खते व बियाणाच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांकडून लगबग सुरू आहे. शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचे बियाणे व खते उपलब्ध होण्याच्या दृष्टीने सध्या जिल्ह्यातील कृषि सेवा केंद्रांची तपासणी कृषी विभागाकडून सुरू आहे. यासाठी जिल्हास्तरावर एक व तालुकास्तरावर एक असे जिल्ह्यात एकूण ११ भरारी पथकाची स्थापना केली आहे. चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ (ता.चाकूर) येथील खत विक्री केंद्राची तपासणी जिल्हास्तरीय भरारी पथकाने केली. जुन्या खताचा साठा जास्तीच्या दराने विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले. यावेळी मे. चौधरी फर्टिलायझर्सवर धडक कारवाई करत दुकानाचा परवाना निलंबित केला आहे.
जिल्हा अधीक्षक कृषि अधिकाऱ्यांनी परवाना केला निलंबित -
वडवळ नागनाथ (ता.चाकूर) येथील खत विक्री केंद्राची तपासणी जिल्हास्तरीय भरारी पथकाने केली. तपासणी दरम्यान बनावट ग्राहकास पाठवून जुने खत उपलब्ध आहे किंवा नाही, सदरील केंद्रावर खताचे दर काय आहेत. याबाबत पथकाने चौकशी केली असता दि. १ एप्रिल, २०२१ पूर्वीचा खत साठा उपलब्ध असतानाही खत उपलब्ध नाही असे बनावट ग्राहकास सांगितले. शिवाय जुने खताचा साठा जास्तीच्या दराने विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले. यावेळी पथकाने मे. चौधरी फर्टिलायझर्सवर छापा मारुन खत नियंत्रण कायदा १९८५ च्या खंड (३) ३, ३५(ए), जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ मधील कलम ३ (२) चे उल्लंघन केल्याप्रकरणी लातूरचे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी सदरील केंद्राचा परवाना निलंबित केला आहे.