अमरावती - राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आणि अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणे धारणीतील एका कृषी पर्यवेक्षकाला महागात पडले आहे. या प्रकरणी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी पर्यवेक्षकाला निलंबित केले आहे. अरुणकुमार रोंगे बेठेकर असे निलंबित करण्यात आलेल्या कृषी पर्यवेक्षकाचे नाव आहे. धारणी पोलीस ठाण्यामध्येसुद्धा त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
काय होती पोस्ट?
धारणी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात कृषी पर्यवेक्षक पदावर असलेल्या अरुणकुमार रोंगे बेठेकर याने मंत्री यशोमती ठाकूर यांच्या विरोधात तीन दिवसांपूर्वी व्हॉट्सअॅपवर एक आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केली होती. त्या पोस्टमध्ये 'बोगस ट्राइब्स' की समर्थक यशोमती ठाकूर असा उल्लेख केला होता. खऱ्या आदिवासींवर अन्याय करून बोगस लोकांना साथ देणाऱ्या मंत्री यशोमती ठाकूर यांचा जाहीर निषेध, त्यांची तत्काळ मंत्री मंडळातून हकालपट्टी करण्यात यावी, असा उल्लेख या पोस्टमध्ये करण्यात आला होता.
यशोमती ठाकूरांवर गंभीर आरोप -
ठाकूर खऱ्या आदिवासींवर अन्याय करत आहेत. अनुसूचित जमाती जात पडताळणी समितीच्या अधिकाऱ्यांना धमकावून त्यांच्यावर राजकीय दडपण ठाकूर आणत आहेत, असा आरोप या पोस्टच्या माध्यमातून केला गेला. मागील तीन दिवसांपासून ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी या आक्षेपार्ह पोस्टचा निषेध करत कृषी पर्यवेक्षक अरुणकुमार रोंगे बेठेकर याच्या विरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आता कृषी विभागानेही त्याला निलंबित केले आहे.