अमरावती -अकोला जिल्ह्यात अकोट तालुक्यातील मारोडा या गावात इयत्ता बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीवर 4 नराधमांनी बलात्कार करुन तिची हत्या केली होती. ही घटना 14 डिसेंबरला घडली होती. या घटनेच्या निषेधार्थ आज (गुरूवारी) शहरात मातंग समाजाच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणात विशेष लक्ष देऊन आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
अकोट तालुक्यातील मारोडा येथे 14 डिसेंबरला घडलेल्या घटनेनंतर अमरावती विभागात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात अद्याप दोषींवर कुठलीही कारवाई झाली नाही. त्यामुळे येथील नेहरू मैदानापासून विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. मोर्चात विदर्भातील मातंग समाज बांधव मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.