अमरावती - कृषी कायद्याविरोधात पंजाब, राजस्थान हरियाणासह आदी राज्यातील शेतकऱ्यांचे दिल्लीत तीव्र आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हजारो कार्यकर्ते व शेतकऱ्यांसोबत राज्यमंत्री बच्चू कडू हे आज दिल्लीकरिता रवाना झाले आहे. त्याच पार्श्वभूमीवर बच्चू कडूंनी हजारो शेतकऱ्यांसह गुरुकुंज मोझरी येथे 'चक्काजाम' आंदोलन केले. या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 हा ठप्प झाला होता.
गुरुकुंज मोझरी येथून दिल्लीच्या दिशेने रवाना -
राज्यमंत्री बच्चू कडू हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या गुरुकुंज मोझरी येथून दिल्लीच्या दिशेने रवाना झाले आहे. त्यांचा पहिला मुक्काम हा अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथे असणार आहे. उद्या ते मध्यप्रदेशची सीमा ओलांडणार आहे. त्यानंतर मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चव्हाण यांच्या घराला ते घेराव घालणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री चव्हाण हे बच्चू कडू यांना मध्य प्रदेशात येऊ देतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, कुठल्याही सरकारच्या दबावाला बळी न पडता शिवाजी महाराजांप्रमाणे गनिमीकावा करून थेट दिल्ली गाठणार असल्याचे बच्चू कडू यांनी स्पष्ट केले आहे.