अमरावती :राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर आपण नाराज आहे. त्याबाबत सर्व काही सकारात्मक होईल, असे मुख्यमंत्र्यांनी फोन करुन सांगितले. 17 जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करूनच पुढचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला जाईल, अशी प्रतिक्रिया आमदार बच्चू कडू यांनी दिली आहे.
राष्ट्रवादीला विरोध करणारे काय करणार : शिवसेनेच्या ४० आमदारांनी महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपसोबत सरकार स्थापन केले. तेव्हा राष्ट्रवादीमुळे आम्हाला महत्त्व नाही, असा आरोप शिवसेनेचे नेते करत होते. आता या सरकारमध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार उपमुख्यमंत्री झाले आहेत. मी अजित पवारांचे स्वागत करतो, पण राष्ट्रवादीला विरोध करणारे शिवसेना नेते आता काय करणार, असा सवालही बच्चू कडू यांनी उपस्थित केला.
सामान्य माणसांचा लाभ व्हावा :विरोधक एकत्र आल्याने सध्याची राजकीय परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. सर्व घडामोडी घडत असल्या तरी सर्वसामान्यांचे भले व्हावे हा एकच उद्देश आहे. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अत्यंत कणखर असून सर्वसामान्यांसाठी नेहमीच उपलब्ध असतात, असेही बच्चू कडू म्हणाले.