अमरावती -संत गाडगेबाबा अमरावती विद्यपीठात अजब प्रकार समोर आला आहे. हेमा शर्मा या विद्यार्थिनीने एमबीएच्या पहिल्या दोन सत्राच्या परीक्षा दिल्यावर विद्यापीठाने तिला, तुझा प्रवेश रद्द करण्यात आला असल्याचे सांगितले. 10 महिन्यानंतर प्रवेश नाकारण्यात आल्याचे सांगणाऱ्या विद्यापीठ प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित करत हेमाचे वडील शरद शर्मा यांनी, विद्यापीठाने योग्य न्याय दिला नाही, तर आत्महत्या करू, असा इशारा दिला आहे.
हेही वाचा -पिकअपची दुचाकीला धडक, दोन तरुणांचा जळून मृत्यू
असे आहे प्रकरण
2019-20 या शैक्षणिक सत्रात हेमा शर्मा हिने संत गाडगेबाबा अमरावती विद्यपीठात एमबीएला प्रवेश घेतला. प्रवेश समितीकडे गुणपत्रिकेची सत्यप्रत वगळता सर्व कागदपत्रे तिने सादर केली होती. गुणपत्रिका अनुशेष विषयांमुळे विद्यापीठाकडून उशिरा मिळणार, असे हेमाने प्रवेश समितीला सांगितले. प्रवेश समितीने गुण पत्रिका मिळताच आमच्याकडे सादर करावी, असे सांगितले. दरम्यान 4 डिसेंबर 2019 ला हेमाच्या अनुशेष विषयांचा निकाल लागल्यावर तिने गुणपत्रिका प्रवेश समितीकडे सादर केली. आता प्रवेश निश्चित झाला, असे तिला सांगण्यात आले. त्यानंतर हेमाने एमबीएच्या पहिल्या दोन्ही सत्राची परीक्षा दिली आणि दोन्ही परीक्षा उत्तीर्ण केल्या.