अमरावती- गावपातळीवर ‘मनरेगा’तून रोजगारनिर्मितीबरोबरच शेतक-यांच्या उत्पन्नात भर घालण्यासाठी विविध योजनांचा मेळ व गावातील अंगणवाडी, शाळा, पाणलोट क्षेत्रे आदींचा विकास याद्वारे गावांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी ‘मी समृद्ध तर गाव समृद्ध’ ही योजना उपयुक्त ठरेल. तिच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्वांनी समन्वयाने प्रयत्न व व्यापक नियोजन करण्याचे निर्देश राज्याचे अपर मुख्य सचिव (रोहयो) नंदकुमार यांनी आज येथे दिले.
ना. यशोमती ठाकूर यांनी दिले होते बैठक घेण्याचे निर्देश
राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हा पातळीवर सर्व विभागांच्या क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांची सविस्तर बैठक घेण्याबाबत निर्देश दिले होते. ‘मी समृद्ध तर गाव समृद्ध’ या उपक्रमाचा पथदर्शी प्रकल्पाचे जिल्ह्यात नियोजन व अंमलबजावणी होत आहे. त्यानुषंगाने आज अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नियोजनभवनात बैठक झाली. जिल्हाधिकारी शैलेश नवाल, उपायुक्त धनंजय गोगटे, श्याम मक्रमपुरे, उपजिल्हाधिकारी राम लंके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण सिनारे व प्रशांत थोरात यांच्यासह ग्रामविकास, शिक्षण, महिला व बालविकास, महसूल, मृद व जलसंधारण, रोहयो आदी विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
अपर मुख्य सचिव नंद कुमार म्हणाले..
कोरोना संकटकाळात रोजगारनिर्मितीसाठी मनरेगातून अनेक विकासकामे प्रभावीपणे राबविण्यात आली. मात्र, आता पारंपरिक कामे व रोजगारनिर्मितीपुरताच हेतू न ठेवता त्याद्वारे ग्रामीण जीवनात समृद्धी आणण्यासाठी व शेतक-यांचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध योजनांचा मेळ घालून त्याच्या उत्पन्नात भर घालता येणे शक्य आहे. गावासाठी भौतिक सुविधांची निर्मितीही करता येणे शक्य आहे. त्यासाठी व्यापक नियोजन आवश्यक आहे. नियोजन करताना ज्या गोष्टीचा शेतकरी बांधवांना फायदा होईल अशी कामे हाती घ्यावीत. शेतकरीहिताची कामे राबवताना त्यांचे महत्वही शेतक-यांना पटवून देण्याची व लोकसहभाग मिळविण्याची क्षेत्रीय स्तरावरील यंत्रणेची जबाबदारी आहे. गावातील अनेक नागरिकांचा श्रमदानाचा सहभाग अंगणवाडी, शाळा आदींसाठी मिळवता येणे शक्य आहे. अशा कामासाठी नियोजित निधीचा विनियोग सार्वजनिक हितासाठी करता येईल. विद्यार्थ्यांना टॅब उपलब्ध करून माहिती तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण अधिक प्रभावीपणे देता येईल. लोकसहभाग मिळविण्यासाठी अशा संकल्पनांचाही नियोजनात समावेश करावा. शेतकरी बांधवांच्या बांधावर वृक्षलागवड, फळबाग लागवड, सिंचन विहिर, गुरांचे गोठे, जलसंधारण अशी कैक कामे राबवून शेतक-यांची आर्थिक उन्नतीकडे वाटचाल होण्याच्या दृष्टीने परिपूर्ण नियोजन करावे. उपलब्ध बाजारपेठेनुसार उत्पादनाचे नियोजन, प्रगतशील शेतक-यांच्या यशोगाथा चर्चासत्र, प्रशिक्षण आदी माध्यमातून पोहोचवणे, शेतक-यांच्या वैयक्तिक समृद्धीसह गावाची समृद्धी साधण्यासाठी व्यापक नियोजन व सर्वंकष प्रयत्न करणे आवश्यक आहे.
अतिरिक्त मुख्य सचिव नंदकुमार यांनी घेतला 'मी समृद्ध तर गाव समृद्ध' योजनेचा आढावा - मी समृद्ध तर गाव समृद्ध योजना अमरावती
‘मी समृद्ध तर गाव समृद्ध’ या उपक्रमाच्या पथदर्शी प्रकल्पाचे जिल्ह्यात नियोजन व अंमलबजावणी होत आहे. त्यानुषंगाने आज अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवनात बैठक झाली.

शेतकरी बांधवांना लखपती बनविण्याचा उद्देश
जिल्हाधिकारी श्री. नवाल म्हणाले की, ‘मनरेगा’अंतर्गत 2021-22 साठी गावांच्या विकासाचे उद्दिष्ट ठेवून 4393 कोटी 33 लक्ष रुपये निधीचे नियोजन करण्यात आले आहे. गतवर्षीच्या तुलनेत नियोजन 218 टक्के एवढे अधिक आहे. याद्वारे 20 कोटी 41 लक्ष मनुष्यदिन निर्मिती अपेक्षित आहे. शेतकरी बांधवांना लखपती बनविण्याच्या उद्देशाने फळबाग लागवड, गुरांचे गोठे, नाडेप खतनिर्मिती, बांधावरील लागवड, रेशीम विकास, सिंचन विहिर या वैयक्तिक व इतर सार्वजनिक कामांवर भर दिला आहे.
ही कामे राबविताना क्षेत्रीय स्तरावरील अधिका-यांना कुठेही अडचण आल्यास किंवा कुठे प्रतिसाद मिळत नसल्यास थेट आपल्याशी संपर्क साधावा. ग्रामजीवनात समृद्धी आणण्यासाठी हा अत्यंत प्रभावी उपक्रम असून, आपल्या सगळ्यांनी सकारात्मकपणे व समन्वयाने कामे करावीत, असे आवाहनही श्री. नवाल यांनी केले. मी समृद्ध तर गाव समृद्ध ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून यंदा मनरेगा कामांचे नियोजन केले आहे. सर्व गावांची शिवारफेरी घेऊन शाळा व अंगणवाडी विकास, तसेच वैयक्तिक व सामूहिक हिताच्या अनेक कामांचा समावेश केला असल्याचे उपजिल्हाधिकारी श्री. लंके यांनी सांगितले. यावेळी जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी विजय चव्हाळे, सामाजिक वनीकरणाचे सहायक वनसंरक्षक अतुल पाटोळे, वाल्मी येथील प्रा. राजेश पुराणिक, कारंजा लाड येथील तालुका कृषी अधिकारी संतोष वाळके यांनी विविध योजना व कामांची माहिती दिली.