अमरावती :बॉलीवूडच्या झगमगाटात जीवन जगणारे गगन मलिक यांनी बौद्ध धर्म का स्वीकारला ? ते बौध्द धर्माचा प्रचार प्रसार का करत आहेत याचे गुढ त्यांनी उकलले. एका कार्यक्रमानिमित्त ते अमरावती येथे आले असता त्यांच्याशी ईटीव्हीचे प्रतिनिधी मनिष भंकाळे यांनी संवाद साधला. गगन मलिक म्हणाले की, श्री सिद्धार्थ गौतम यांची भूमिका करताना त्यांचे चरित्र मी वाचले आणि त्यांच्या चरित्रामधूनच मला बौद्ध धर्माविषयी जाणून घेण्याची इच्छा निर्माण झाली. त्यामुळेच आज मी एक बौद्ध प्रचार प्रसारक (Gagan Malik accepted Buddhism) बनल्याची भावना अभिनेते गगन मलिक यांनी ईटीव्हीशी बोलताना व्यक्त केली.
2014 लाचं बौध्द धर्मात प्रवेश :2014 मध्ये श्रीलंकेमध्ये असताना मी बुद्धिस्ट बनलो. तेव्हापासूनच मी बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करत आहे. मी माझ्या रीअल लाईफमध्ये राम हनुमान कृष्ण विष्णू यांच्या एक अभिनेता म्हणून भूमिका केल्या, परंतु श्री सिद्धार्थ गौतम यांची भूमिका करताना त्यांच्या जीवनचरित्राची माझ्या वर एक वेगळीच छाप पडली. त्यांच्या चरित्रांमधूनच मला त्यांच्या जीवनाविषयी समजले. बुद्धाच्या ज्ञानाची खोली मला जाणवली आणि समजली सुद्धा. बुद्धाचा धर्म हा खूप निराळा आणि चांगला आहे. म्हणूनच बौद्ध धर्म स्वीकारण्याची माझी इच्छा झाली. बौद्ध धर्म हा सर्व धर्माचा आदर करायला शिकवतो. सिद्धार्थ गौतम आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर हेच माझे प्रेरणास्त्रोत असल्याचे गगन मलिक यांनी यावेळी सांगितले.