अमरावती :मध्य प्रदेशातून बोगस रासायनिक खते महाराष्ट्रात येत असल्याचे खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. अमरावती जिल्ह्यातील माहुली जहागीर येथील एका गोदामातून पोलिसांनी २.३९ कोटी रुपयांचे बनावट खत जप्त केले आहे. तसेच जळगावातही बारा लाख रुपयांचे खत जप्त करण्यात आले आहे. या बोगस रासायनिक खताचा साठा मध्यप्रदेशातील जबलपूर येथेही आढळून आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
अमरावतीमध्ये अनधिकृत खत सापडले :माहुली जहागीर परिसरात अनधिकृत खतांचा साठा असल्याची माहिती कृषी अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यांनी यासंदर्भात पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी अनंत वाढोकार यांच्या शेतात छापा टाकला. त्यावेळी पोलिसांना गोदामाच बोगस खतांचा साठा आढळून आला. यावेळी विविध बोगस कंपन्यांचा तसेच गोदामाच्या बाहेर उभ्या असलेल्या ट्रकमध्ये 2 कोटी 38 लाख 99 हजार 73 रुपये किमतीचा खताचा अनधिकृत साठा पोलिसांनी जप्त केला आहे. यावेळी पोलिसांनी मध्य प्रदेशातील रेवा तालुक्यातील रहिवाशी मोहम्मद मुमताज अली, जिल्ह्यातील अमरावती शिरजगाव येथील अब्दुल वाहिद शेख हुसेन, माहुली येथील रहिवासी अनंत अधिकारी, महेशकुमार रूपसिंग या चौघांना अटक केली आहे.
पोलिसांनी घेतली गंभीर दखल :माहुली जहागीर येथील एका गोदामावर छापा टाकल्यानंतर अनधिकृत खत पोलिसांना सापडले. पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी याप्रकरणी एकूण चार पथके तयार करून जळगाव, धुळे, मध्य प्रदेश आणि हैदराबादकडे रवाना केली आहेत.