अमरावती -अमरावती पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत येणाऱ्या वलगाव पोलीस ठाण्यात गुरुवारी सायंकाळी आरोपीने चक्क पोलीस ठाण्यात स्वतःचा शर्ट पंख्याला लटकवून गळफास घेतला. अरुण बाबाराव जवंजाळ (50) असे आत्महत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर अल्पवयीन युवतीवर अत्याचार केल्याचा आरोप होता. या घटनेमुळे खळबळ उडाली असून वलगाव पोलीस ठाण्याच्या परिसरात तणाव निर्माण झाला आहे.
आष्टी गावात खळबळ -
वलगाव पोलीस ठाण्यात आत्महत्या करणारा आरोपी अरुण जवंजाळ हा लगतच्या आष्टी गावातील रहिवासी होता. घराशेजारील अल्पवयीन मुलीवर त्याने अत्याचार केला, अशी तक्रार पीडितेने गुरुवारी दुपारी वलगाव पोलीस ठाण्यात दिली होती. या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी अरुण जवंजाळ याला आष्टी येथील त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेऊन वलगाव पोलीस ठाण्यात आणले होते. अरुण जवंजाळ यांनी पोलीस ठाण्यातच गळफास घेतल्याने आष्टी गावात खळबळ उडाली आहे. त्यामुळे गावात तणाव निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
हेही वाचा -देश अंबानी,अदानींच्या हातात सोपवला जातोय, भविष्यात गंभीर परिणाम होतील -मेधा पाटकर
पोलीस आयुक्त पोहोचल्या वलगाव पोलीस ठाण्यात -
घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह या वलगाव पोलीस ठाण्यात पोहोचल्या. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस अधीक्षक अमोघ गावकर, राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस अधीक्षक दिप्ती ब्राह्मणे या सुद्धा वलगाव पोलीस ठाण्यात पोहोचल्या. प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्या उपस्थितीत घटनेचा पंचनामा करण्यात आला.
महिनाभरातील दुसरी घटना -
महिनाभरापूर्वी 19 ऑगस्ट रोजी राजापेठ पोलीस ठाण्याच्या कोठडीत सागर ठाकरे या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. ही घटना ताजी असताना वलगाव पोलीस ठाण्यात आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने पोलीस दल हादरले आहे.
पोलीस ठाण्याबाहेर तणाव -
अरुण जवंजाळ या आरोपीने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच त्यांच्या नातेवाईकांसह लगतच्या आष्टी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने वलगाव पोलीस ठाण्यासमोर धडकले. यामुळे पोलीस ठाण्यासमोर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस ठाण्यात समोरील गर्दीमुळे अमरावती-परतवाडा या मार्गावरील वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला होता. पंचनामा केल्यावर मृतक अरुण जवंजाळ यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात येणार आहे.
हेही वाचा-नागपूर, पुणे ग्रामीणनंतर आता अमरावतीच्या महिला पोलिसांना बाराऐवजी 8 तासाची ड्युटी