अमरावती :महाराष्ट्रात वाघांची संख्या झपाट्याने वाढत आहे. वन्यजीव संस्थेच्या अहवालानुसार 2022 च्या व्याघ्र गणनेनुसार महाराष्ट्रात जवळपास 446 वाघ आहेत. 2006 मध्ये महाराष्ट्रात वाघांची संख्या ही 103 इतकी होती. 2010 च्या व्याघ्रगणनेनुसार महाराष्ट्रात वाघांची संख्या ही 168 वर पोहोचली. 2014 मध्ये महाराष्ट्रात एकूण 190 वाघ होते. पुढील चार वर्षात वाघांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली. 2018 च्या व्याघ्र गणनेनुसार महाराष्ट्रात 312 वाघ होते. वाघांच्या संख्यावाढीचा आलेख पुढील चार वर्षे देखील कायम राहिला. 2022 च्या व्याघ्र गणनेनुसार आज महाराष्ट्रात जवळपास 446 वाघ आहेत. राज्यात वाघांचे प्रमाण हे 23 टक्क्याने वाढत असल्याचे शुभ संकेत आहेत, असे महाराष्ट्र वन्यजीव मंडळाचे माजी सदस्य यादव तरटे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले आहे.
व्याघ्र संवर्धनासाठी सज्ज होण्याची गरज :आज वाघांच्या बाबतीत जगात भारत पहिल्या क्रमांकावर आहे. त्यातही महाराष्ट्रात वाघांची संख्या सर्वाधिक असणे, ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. 1900 मध्ये भारतात एकूण 40,000 वाघ होते. 1971 मध्ये दुर्दैवाने भारतात केवळ 1800 वाघ उरले होते. देशाच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी वाघांच्या मोठ्या प्रमाणात खालावलेल्या संख्येची गांभीर्याने दखल घेत भारतीय वन्यजीव अधिनियम 1972 हे कलम लागू केले. तसेच 1973 मध्ये व्याघ्र प्रकल्प योजना जाहीर केली.