अमरावती - जिल्ह्यातील चांदूर रेल्वे-धामणगाव रस्त्यावर मांडवा गावाजवळ मंगळवारी भीषण अपघात झाला. दोन दुचाकी आणि एक छोटा टम्पो, अशा तीन वाहनांंच्या धडकेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, इतर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास हा अपघात झाला.
पोलीस अधिकारी ठाणेदार दीपक वानखडे यांची प्रतिक्रिया... हेही वाचा -राज्य सरकारने बघ्याची भूमिका घेतल्यास आंदोलन अटळ - राजू शेट्टी
प्राप्त माहितीनुसार, एम.एच. ३० ए.बी. ००७६ या क्रमांकाचा टाटा-एस हा छोटा टेम्पो धामणगावरून चांदूर रेल्वेमार्गे दर्यापुर येथे चालला होता. त्यावेळी विरूद्ध दिशेने एक दुचाकी येत असताना मांडवा गावाजवळ वळणावर टेम्पो दुसऱ्या बाजुकडे गेल्याने विरूध्द दिशेने येणारी दुचाकी थेट टेम्पोची काच फोडून ड्रायवरच्या केबिनमध्ये घुसली. यामध्ये टाटा-एस टेम्पोचालक मोहम्मद आसिफ आजवानी (रा. दर्यापुर) आणि दुचाकीचालक राजेंद्र अंबादास बुटलेकर (रा. कृष्णा कॉलनी, धामणगाव रेल्वे) या दोघांचा जागीच मृत्यु झाला.
तर, त्याचवेळी सदर दुचाकीमागून दुसरी दुचाकी येत होती. या दुचाकीची सुध्दा टोम्पोला धडक बसली. यामध्ये दुसऱ्या दुचाकीवरील आशुतोष शिवशंकर बावस्कर (२१ रा. भिकुजीनगर, रामगाव रोड, धामणगाव रेल्वे) आणि अंकुश वानखडे (२१ रा. धामणगाव रेल्वे) हे दोघे जखमी झाले. या अपघाताचा पुढील तपास ठाणेदार दीपक वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली चांदूर रेल्वे पोलीस करत आहेत.