अमरावती - रेल्वे विभागाने भंगार रेल्वेच्या डब्याला फाईव्ह स्टार हॉटेलचे स्वरुप दिले आहे. या बोगीत आहार एक्सप्रेस सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे रेल्वे गाडीच्या प्रथम श्रेणी वातानुकूलित बोगीत बसून स्वादिष्ट जेवणावर ताव मारण्याचा अनुभव सध्या अमरावतीकर घेत आहेत. मध्य रेल्वेच्या वतीने अमरावती शहरातील मॉडेल रेल्वे स्थानकावर सुरू करण्यात आलेल्या आहार एक्सप्रेस या रेस्टॉरंटला अमरावतीकरांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.
भंगार डबा झाला फाईव्ह स्टारमध्य रेल्वेच्या वतीने एका गाडीचा भंगार पडलेला डबा अमरावती शहरातील मॉडेल रेल्वे स्थानकावर अगदी दर्शनी भागात ठेवण्यात आला होता. मध्य प्रदेशातील भोपाळ आणि इटारसीनंतर अमरावती रेल्वे स्थानकावर असणाऱ्या या बोगीला आलिशान रेस्टॉरंटमध्ये परिवर्तित करण्याचा कंत्राट कल्याण येथील राजेश भटनागर यांच्या पियुष ट्रेडर्स या कंपनीने घेतला. रेल्वेला गत 22 वर्षांपासून जेवणासह ब्लॅंकेट, उशा, पुरवणाऱ्या पियुष ट्रेडर्सने अमरावती रेल्वे स्थानकावरील भंगार बोगी आज शहरातील खास आकर्षण म्हणून साकारली. बोगीला पूर्णतः रेस्टॉरंटचे स्वरूप देण्यात आले आहे.
रेल्वेच्या बोगीत बसून जेवणाचा फीलहे रेस्टॉरंट अतिशय सुंदर, चकचकीत आणि खवय्यांना आकर्षित करणारे असे आहे. आपण रेल्वेगाडीच्या बोगीत बसूनच जेवण करतो आहे, असा फील या रेस्टॉरंटमध्ये जेवण करताना येतो. या ठिकाणी ताव मारण्यासाठी येणारे अमरावतीकर 'ईटीव्ही भारत 'शी बोलताना समाधान व्यक्त करताना येथील व्यवस्था उत्कृष्ट असल्याचे म्हणाले. या रेस्टॉरंटमध्ये सुंदर अशा दिव्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रथम श्रेणी वातानुकूलित बोगीमध्ये असणारे फॅन या रेस्टॉरंटमध्ये लावण्यात आले आहेत. बसण्यासाठी देखील अतिशय उत्कृष्ट दर्जाच्या टेबल खुर्च्याची व्यवस्था या रेस्टॉरंटमध्ये आहे. दोन वातानुकूलित संच बोगीमध्ये लावण्यात आले असून बेसिंनचे ठिकाण देखील अतिशय उत्कृष्ट दर्जाचे या ठिकाणी पाहायला मिळते.
रेस्टॉरंटमधील कॅप्टन हा टीसी सारखाचरेस्टॉरंटमधील कॅप्टन हा जणू रेल्वेमध्ये येणाऱ्या टीसी प्रमाणेच भासतो. बोगीत काम करणारा प्रत्येक व्यक्ती हा अतिशय शिस्तीत आणि नेटकेपणाने वागत असल्याने एक उच्च दर्जाचा फील या ठिकाणी जेवण करताना येतो. ज्या ठिकाणी ही आहार एक्सप्रेस उभी आहे तो परिसर सुंदर अशा रोषणाईने झगमगीत करून बोगीच्या बाहेर देखील जेवण करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या बोगीमध्ये 48 जण जेवण करू शकतात, तर 40 जण बोगीबाहेर असणाऱ्या खुल्या मैदानात जेवणाचा आस्वाद घेऊ शकतात अशी माहिती या आहार रेस्टॉरंटचे व्यवस्थापक गिरीश देशमुख हे 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हणाले. विशेष म्हणजे अमरावती शहरातील अनेक रेस्टॉरंटमध्ये वाहनांना पार्किंगची सुविधा उपलब्ध नाही. मात्र या आहार रेस्टॉरंट परिसरात अमरावतीकरांना आपले वाहन सहज पार्क करता येईल अशी भरपूर व्यवस्था देखील आहे.
वीस जणांना मिळाला रोजगारअमरावती मॉडेल रेल्वे स्थानकावर साकारण्यात आलेल्या या आहार एक्सप्रेस रेस्टॉरंटमुळे अमरावती जिल्ह्यासह लगतच्या परिसरातील 20 युवकांना रोजगार मिळाला आहे. एकूण वीस जणांना या रेस्टॉरंट मार्फत रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. नेपाळी शेफसह एकूण 15 जण या रेस्टॉरंटमधील किचनमध्ये कामाला आहेत. त्यापैकी काही जणांकडे नाश्त्याची जबाबदारी तर काही जणांकडे विशिष्ट मेनू आणि मुख्य शेफ हा चवदार भाज्या बनवण्यासाठी आहे.
24 तास सेवाअमरावती मॉडेल रेल्वे स्थानकावर दहा डिसेंबरपासून सुरू झालेल्या या आहार एक्सप्रेस रेस्टॉरंटची सेवा अगदी 24 तासापर्यंत उपलब्ध आहे. रात्री शहरात आलेल्या व्यक्तींना भूक लागल्यावर कुठेही जेवणाचा पर्याय नसतो. मात्र अमरावती रेल्वे स्थानकावर व्हेज नॉनव्हेज अशा कुठल्याही जेवणाची सुविधा रेल्वेच्या ह्या प्रकल्पामुळे अमरावतीत आता उपलब्ध झाली आहे.
असे आहेत मेनूया आहार एक्सप्रेस रेस्टॉरंटमध्ये दक्षिण भारतातील इडली, डोसा, मसाला डोसा, उत्तप्पा यासह महाराष्ट्रीयन मिसळ पाव, वडापाव, राजस्थानी व्यंजन तसेच आईस्क्रीम देखील उपलब्ध आहे. शुद्ध शाकाहारी जेवणातील सर्व प्रकारचे व्यंजन तसेच नॉनव्हेजमध्ये देखील सर्व प्रकार या आहार रेस्टॉरंटमध्ये खवय्यांना परवडेल अशा योग्य दरात चाखायला उपलब्ध आहेत.