अमरावती :कल्याण नगर नजिकच्या दरोगा प्लॉटमध्ये राहणाऱ्या निखिल अनिल वाघमारे या तरुणाने आपली पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर सरकारी नोकरीमध्ये जाण्यासाठी मन लावून राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिका दस्तूर नगर येथील अभ्यासिकेत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला. पाच-सहा वर्ष अभ्यास केल्यानंतर मात्र त्यात त्याला फारशे यश आले नाही. परंतु या अभ्यासा दरम्यान एक गोष्ट मात्र चांगली झाली की, त्याला वाचनाची आवड लागली. स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांव्यतिरिक्त त्याला अवांतर पुस्तके वाचनात तो अगदी गढून जात असे. चळवळ त्याच्या रक्तातच. वाचनामुळे त्याच्यावर डाव्या विचारसरणीचा अधिक पगडा झाला.
बुककट्टा ऑनलाइन स्टोअरचा जन्म :वाचनासाठी आपल्याला हवी तशी पुस्तके इकडे मिळत नाहीत. म्हणून त्याने पुस्तकासाठी आपला मोर्चा विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्याकडे वळवला. कारण 90% पुस्तके पुण्यातून प्रकाशित होतात. मोठमोठ्या प्रकाशन संस्था पुण्यात आहेत. माझ्यासारखे असे असंख्य वाचक असू शकतात की, ज्यांना वाचनिय आणि दर्जेदार पुस्तक कुठे आणि कसे मिळेल याविषयी माहिती नसेल. त्यामुळे अशा चोखंदळ वाचकांना आपणच पुस्तके उपलब्ध करून दिली तर? या एका संकल्पनेतून बुककट्टा या ऑनलाइन स्टोअरची कल्पना सुचल्याचे निखिलनी सांगितले.
सामाजिक माध्यमाचा केला चांगला वापर :25 डिसेंबर 2020 ला वीस पुस्तके खरेदी करून सुरू केलेला व्यवसायाची वार्षिक उलाढाल सात ते आठ लाख रुपयाची आहे. पुढल्या वर्षी पर्यंत ही उलाढाल बारा लाखापर्यंत पोहोचणार असल्याचे त्याने सांगितले. अवघ्या दोन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या बुककट्टा या ऑनलाईन स्टोअरला आज साडेसात हजार वाचक जुळल्याचे निखिलने सांगितले. फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्राम या सामाजिक माध्यमाचा त्याने चांगलाच वापर करून घेतला. संपूर्ण महाराष्ट्रात त्याने वाचकांचे नेटवर्क उभे केले आहे. पुस्तक विक्रीच्या व्यवसायाला जास्त जागा लागणारी असे त्याला वाटत होते. म्हणून त्याने आपल्या घरूनच व्यवसायास सुरुवात केली. सहा आठ महिन्यातच व्यवसाय बहरण्यास सुरुवात झाली आणि त्याला आता व्यवसाय करण्यासाठी जागा अपुरी पडू लागली म्हणून त्याने हा व्यवसाय साईनगर येथील घरी हलवला.
पश्चिम महाराष्ट्रात वाचकांची संख्या अधिक :पुस्तक विक्रीचा व्यवसाय हा दीर्घकालीन गुंतवणुकीचा आहे. कोणता वाचक केंव्हा कोणते पुस्तक मागेल याचा नेम नसतो. स्टॉक हा नेहमी ठेवावाच लागतो. या व्यवसायामध्ये संयम खूप महत्त्वाचा आहे. माझ्या स्टोअर मधुन दररोज 30 ते 40 पार्सली निघतात. त्यापैकी दोन ते तीन पार्सली फक्त विदर्भातच्या असतात. इतर सर्व पार्सली पश्चिम महाराष्ट्राच्या असतात. पश्चिम महाराष्ट्रात वाचक अधिक आहेत. त्यामुळेच त्यांच्या आवडीनुसार मी पुस्तकांची यादी त्यांना पाठवत असल्याचे निखिल सांगितले.