अमरावती -कुपोषण, बेरोजगारी, आरोग्याच्या समस्या, नापिकी यामुळे सातत्याने चर्चेत राहणाऱ्या मेळघाटमध्ये आता प्रगतीशील शेतीची नांदी सुरू झाली आहे. पारंपरिक पिकांना रामराम ठोकून एका उच्चशिक्षित तरुणाने स्ट्रॉबेरी शेती करायचा विचार केला आणि तो विचार कृतीत उतरवत यशस्वी शेतीकडे वाटचाल सुरू केली. चिखलदऱ्याजवळील मोथा या गावातील रमेश पाटीलने ७ वर्षांपूर्वी ही स्ट्रॉबेरी शेती सुरू केली होती आणि आज त्यातून त्यांना चांगला नफा मिळत आहे.
अमरावतीच्या मेळघाटातील चिखलदरा पासून ५ किमी अंतरावर असलेले मोथा हे गाव. या गावातील लोकांचे उत्पादनाचे साधन म्हणजे दुग्ध व्यवसाय. मात्र, दुधाला सध्या पाहिजे तेवढा भाव नाही. अनेक शेतकरी येथे पारंपरिक शेती करतात. उच्चशिक्षित असलेले रमेश हे पारंपरिक शेती करायचे. मात्र, चिखलदऱ्यात नेहमी पाऊस जास्त पडतो. त्यामुळे शेतीचे नुकसान होत होते. दरम्यान, रमेशने चिखलदराच्या थंड वातावरणाला पोषक असलेल्या स्ट्रॉबेरी शेतीची लागवड करायचा विचार केला. त्यांच्या या उपक्रमाला घरच्यांचीही साथ मिळाली.
रमेशने पहिले जमिनीचे सपाटीकरण करून, ५ फूट अंतरावर समांतर गादी वाफे तयार केले. त्यावर महाबळेश्वर येथून आणलेली स्ट्रॉबेरीची रोपे समान अंतरावर लावली. ड्रीपद्वारे पाणी देऊन मशागत केली आणि बघता बघता स्ट्रॉबेरीची बाग फुलली. विशेष म्हणजे रासायनिक खतांचा वापर न करता घरी असलेल्या गुरांचे शेणखत वापरले. स्ट्रॉबेरीचे पीक हे ६ महिन्यांचे असते. रमेशने यावर्षीसुद्धा स्ट्रॉबेरीची लागवड केली असून आता स्ट्रॉबेरी येण्यास सुरुवात झाली आहे. सोबतच त्याने उरलेल्या जागेत लसणाची लागवड केल्याने त्याला त्यातूनही उत्पन्न मिळत आहे.