अमरावती:धावपळीच्या आणि धकाधकीच्या आयुष्यात मधुमेह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढायला लागली आहे. एकदा झालेला हा विकार आयुष्यभर त्रास देणारा असून मधुमेह होऊ नये किंवा हा विकार काळजी घेणे हाच एकमेव महत्त्वपूर्ण उपचार आहे. 14 नोव्हेंबरला असणाऱ्या जागतिक मधुमेह दिनानिमित्त मधुमेहा बाबत जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने अमरावती शहर आणि जिल्ह्यात विविध उपक्रम राबविले जात आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रीय संसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत शासकीय रुग्णालयातून मधुमेह रुग्णांना अवघ्या दहा रुपयात महिनाभराचे औषध उपलब्ध करून दिले जात आहे.
योग्य आहार आणि व्यायाम महत्त्वपूर्ण पर्याय:मधुमेह टाळण्यासाठी योग्य आहार आणि नियमित व्यायाम हा महत्त्वपूर्ण पर्याय असल्याचे तज्ञ डॉक्टरांनी ईटीव्ही भारतची बोलताना सांगितले. संतुलित आहारासोबतच रोज तासभर पायी चालल्याने मधुमेह या आजारापासून आपल्याला दूर राहता येतं. ज्या व्यक्तींना मधुमेह जडला त्यांनी देखील जेवणात साखरेवर नियंत्रण ठेवले आणि नियमित व्यायाम करणे अत्यंत गरजेचे आहे. ज्यांना मधुमेह जडला त्यांनी नियमित औषध घेणे अतिशय महत्त्वाचे असल्याचे मधुमेह तज्ञ डॉ. राजेंद्र ढोरे ई टीव्ही भारतची बोलताना म्हणाले.
किडनीवर होतो परिणाम:भारतातील पंचवीस टक्के लोकांना मधुमेह जडला आहे. आपल्या देशाची लोकसंख्या प्रचंड असल्यामुळे या आजाराबाबत जनजागृती करणे हवे तितके शक्य नाही. मात्र जनजागृती करण्याचा प्रयत्न होणे, आवश्यक असल्याचे किडनी रोग तज्ञ डॉक्टर अविनाश चौधरी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हणाले. ज्या व्यक्तींना मधुमेह जडला आहे त्यापैकी सात ते आठ टक्के रुग्णांना पहिल्या चार ते पाच वर्षात किडनीवर दुष्परिणाम झालेले आढळून येतात .आजाराचे लक्षण जाणवायला लागतात. 25 टक्के जणांना दहा वर्षांनी किडनीच्या आजाराचे लक्षण जाणवतात. एकदा किडनीचा आजार सुरू झाला की तो बरा होत नाही आयुष्यभर हा त्रास सहन करावा लागतो. पायावर सूज येणे, थकवा येणे,शरीरातील रक्त कमी होणे, डोळ्याचा पडदा खराब होणे ही किडनी रोगाची लक्षणे जाणवतात. ज्यांना मधुमेहाने ग्रासले आहे, त्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे अतिशय महत्त्वाचे असून किडनीच्या आजारा संदर्भात कुठलेही लक्षण जाणवू लागतात, अशा मधुमेह रुग्णांनी तात्काळ किडनी तज्ञांचा सल्ला घेणे अतिशय गरजेचे असल्याचे डॉ. अविनाश चौधरी म्हणाले.