अमरावती - दर्यापूर तालुक्यातील भुईखेड या गावातील एका शेतकऱ्याने आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर टाकला. त्यानंतर विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. शशिकांत गणेशराव मानकर (वय ४१) असे या शेतकऱ्याचे नाव असून २७ मे रोजी त्यांनी आत्महत्या केली.
मानकर यांनी अकोल्यातील दोन सावकारांकडून ९ लाख रुपये कर्ज काढले होते. त्याचे व्याज वाढत जाऊन एकूण कर्ज १५ लाख झाले होते. ही रक्कम परत करणे शक्य नसल्याने निराश होऊन मानकर यांनी आत्महत्या केली. अकोला येथील सावकार नरेंद्र देशमुख व किशोर देशमुख हे दोन्ही सावकार सावकारकीचा परवाना नसून सुद्धा शेतकऱ्यांना व्याजाने पैसे देतात. वेळेवर पैसे परत न दिल्यास प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून शेकतकऱ्यांची जमीन हिसकावून घेतात ,असा आरोप केला जात आहे. मानकर यांनी देखील याच सावकारांकडून कर्ज घेतले होते.