अमरावती -जिल्ह्यातील चांदूर रेल्वेवरून अमरावतीला जाणाऱ्या रुग्णवाहिकेला बोलेरो पीकअप या चारचाकी वाहनाने जोरधार धडक दिली. यात रुग्णवाहिकेच्या चालकासह चार महिला जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी ६.३० वाजता वाघामाया मंदिराच्या वळण मार्गावर घडली.
बोलेरोची रुग्णवाहिकेला धडक, चालकासह चार महिला जखमी - bolero pickup
चांदूर रेल्वेवरून रूग्ण घेऊन अमरावतीला जाणाऱ्या रूग्णवाहिकेला बोलेरो पीकअप ने जबर धडक दिली. या धडकेत रूग्णवाहिकेच्या चालकासह चार महिला जखमी झाल्या.

चांदूर रेल्वे येथील महेश जवंजाळ हे आपल्या एमएच ३३ जी ६३५ या क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने सोनगाव येथील अनिता अविनाश कडू, सुजाता पाटील, प्रांजली नितीन पाटील, वनिता खडसे यांना अमरावती येथे घेऊन जात होते. यावेळी अमरावतीवरून विरूध्द दिशेने येणाऱ्या बोलेरो पीकअप वाहनाने रुग्णवाहिकेला जोरदार धडक दिली. यामध्ये रुग्णवाहिकेतील चालकासह चार महिला जखमी झाल्या असुन जखमींना तत्काळ अमरावती येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर बोलेरो वाहन चालकाने गाडीसह पोबारा केला. अमरावतीच्या फ्रेजरपुरा पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला. परंतु या घटनेत कोणीही तक्रार दिली नसल्यामुळे गुन्हा दाखल केला नसल्याचे फ्रेजरपुराचे ठाणेदार चोरमले यांनी सांगितले.