अमरावती- जिल्ह्यातील धामणगाव तालुक्यातील शंकर महाराज यांच्या आश्रमाच्या विद्या मंदिरात पाचवीच्या वर्गात शिकणाऱ्या प्रथमेश सगणे या बालकाचा नरबळी देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. 2016 मध्ये ही घटना घडली होती. या प्रकरणी अनिष्ट व अघोरी प्रतिबंधक कायद्यानुसार दोन आरोपींना ७ वर्षाचा कारावास व एक हजार रुपये दंड, व दंड न भरल्यास दोन महिने अतिरिक्त कारावासाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायालयाचे क्रमांक तीनचे न्यायाधीश तिवारी यांनी सुनावली आहे. अनिष्ट व अघोरी प्रतिबंधक कायद्यानुसार महाराष्ट्रात ही पहिलीच शिक्षा सुनावली आहे.
अमरावतीच्या धामणगाव तालुक्यातील पिपळखुटा येथे शंकर महाराज यांचा भव्य आश्रम आहे. याच आश्रमाच्या विद्या मंदिरात प्रथमेश सगणे शिकत होता. या विद्यामंदिरातील भोजनालयात आचारी म्हणून काम करणारे आरोपी सुरेंद्र मराठे व निलेश शेळके या दोन आरोपींकडून विद्यामंदिरात प्रथमेशचा नरबळी देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. आश्रमातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्यावरील मजल्यावर गंभीर अवस्थेत प्रथमेश आढळून आला होता. प्रथमेशच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.